क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
बांबोळीः आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील आजच्या महत्वपूर्ण लढतीत जमशेदपूर एफसीच्या ग्रेग स्टीव्हर्ट आणि मुंबई सिटी एफसीच्या अहमद जाहूचा खेळ निर्णायक ठरणार आहे.
इंडियन सुपर लीगच्या आठव्या हंगामातील ‘प्ले-ऑफ’ फेरीसाठी प्रचंड स्पर्धा असून गतविजेता मुंबई सिटी एफसी आणि जमशेदपूर एफसी यांच्यातील आज होणाऱया लढतीला उपान्त्य फेरीच्या दृष्टीने मोठे महत्व आहे. बांबोळीतील ऍथलेटीक स्टेडियमवर आज ही लढत होईल.
आठव्या हंगामातील गुणतालिकेत जमशेदपूर एफसी आणि मुंबई सिटी एफसी अनुक्रमे चौथय व पाचव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांचे समान 25 गुण असले तरी गतविजेत्यांच्या तुलनेत जमशेदपूरने एक सामना कमी खेळला आहे. उभय संघांतील विजेता संघ तिसऱया स्थानासाठी दावेदारी पेश करेल. तसेच पहिल्या दोन स्थानी असलेल्या हैदराबाद एफसी आणि एटीके मोहन बागान (प्रत्येकी 29 गुण) क्लबमधील अंतर कमी करतील.
मुंबई सिटी एफसीने मागील चार सामन्यांत अपराजित मालिका कायम राखली आहे. त्यांनी दोन बरोबरीनंतर सलग दोन विजय नोंदविलेत. चेन्नईन एफसीविरूद्धच्या निसटत्या विजयानंतर त्यांनी ओडिशा एफसीला मोठय़ा फरकाने हरवले. आता त्यांना सलग तिसल्या विजयाची संधी चालून आली आहे. बिपीन सेगला गवसलेला सूर आता मुंबई सिटीसाठी जमेची बाजू ठरली आहे. ओडिशाविरूद्धच्या विजयात त्याने गोल करताना एक असिस्टही केले आहे. मोरोक्कोचा मीडफिल्डर हा सुद्धा फॉर्ममध्ये असून त्याच्यासमोर आता आयएसएलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम दृष्टिक्षेपात आहे.
‘आम्ही सलग चार सामन्यांत अपराजित आहोत. दुसऱया टप्प्यात आम्ही खेळ उंचावला आहे. मात्र, सातत्य राखण्याचे आव्हान आहे. यावेळचा प्रतिस्पर्धी कडवा आणि मजबूत आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रात आम्हाला आमचा खेळ उंचवावा लागेल’ असे मुंबई सिटी एफसी संघाचे प्रशिक्षक डेस बकींगहॅम म्हणाले.
मुंबई सिटी एफसीप्रमाणेच जमशेदपूर एफसीचा संघाही फॉर्मात आहे. केरळ ब्लास्टर्सला 3-0 गोलानी त्यांनी नमविले आहे आणि दमदार पुनरागमन केले आहे. त्यांची सारी भिस्त डॅनियल चिमा चुक्वू याच्यावर आहे. त्याने मागील तिन्ही सामन्यांत गोल करताना कमालीचे सातत्य राखले आहे. ग्रेग स्टीव्हर्टही आता फॉर्ममध्ये आला असून त्यांच्यासाठी ती एक जमेची बाजू ठरू शकते. आठव्या हंगामातील पहिल्या टप्प्यातील सामन्यात मुंबई सिटी एफसीने जमशेदपूर एफसीवर 4-2 अशा फरकाने विजय मिळवला होता. आजच्या सामन्यात गतविजेते त्यात सातत्य राखण्याचा प्रयत्न करतील तर जमशेदपूर एफसी पराभवाचा बदला घेण्यास उत्सुक आहेत.