प्रतिनिधी / म्हापसा
कुचेली म्हापसा येथे क्रीडा मैदानावर जमावबंदी केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी एकूण 8 जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला असून यापैकी 5 जणांना अटक करून नंतर त्यांची वैयक्तिक जामिनावर सुटका करण्यात आली. कुचेली क्रीडा मैदानावर प्लॉट तयार करून त्याजागी भव्य इमारती उभारण्याचा डाव काही इसमांनी आखला होता. हे येथील नागरिकांना समजल्यावर सर्व पक्षीय नागरिक एकत्रित आले व या ठिकाणी प्लॉट तयार करून इमारती उभारण्याच्या जागेत तीव्र विरोध दर्शविला.
याबाबत म्हापसा पोलिसांनी 144 कलम असताना जमावबंदी केल्याप्रकरणी शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत, काँग्रेस उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस संजय बर्डे, म्हापसा युथचे प्रवीण आसोलकर, समाजसेवक शेखर नाईक यांना अटक करून नंतर त्यांची वैयक्तिक जामिनावर सुटका करण्यात आली. तर आरटीआय कार्यकर्ते जवाहर शेटय़े व फ्रान्सिस फर्नांडिस यापडू शकले नसल्याने त्यांना अटक होऊ शकली नाही. पोलिसांच्या वतीने उपनिरीक्षक आशिष परब यांनी हा गुन्हा नोंद केला होता. भारतीय दंड संहितेच्या कलम 143, 269, 188, अन्वे 149 नुसार हा गुन्हा नोंद केला आहे. उपनिरीक्षक रुपाली गोवेकर याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान राजकीय दबावाखाली आमच्यावर गुन्हा नोंदवून आम्हाला जमावबंदी केल्याप्रकरणी अटक केली आहे. मात्र आम्ही कुचेलीत कोणत्याही परिस्थितीत क्रीडा मैदानावर इमारती उभारण्यास देणार नाही अशी माहिती या पाचही जणांनी जामिनावर मुक्तता झाल्यावर पत्रकारांशी बोलताना सांगितले.