घर-दुकानांपासून चर्चपर्यंत सर्वकाही भूमिगत
सर्वसाधारणपणे गाव जमिनीवर किंवा डोंगराळ भागात वसलेली असतात. पण जगात एक असे देखील आहे, जे भूमिगतच आहे. येथील सर्व लोक ‘भूमिगत’च राहतात. दुकाने, चर्च, मॉल, हॉटेल्सपासून शाळेपर्यंत सर्व काही भूमिगतच आहे.
दक्षिण ऑस्ट्रेलियातील या गावाचे नाव कूबर पेडी आहे. येथील बहुतांश लोक भूमिगत घरांमध्ये राहतात. तेथे ओपलच्या अनेक खाणी आहेत. बहुतांश भूमिगत व्यवस्था उत्खननाच्या उद्देशाने तयार करण्यात आली होती. खाणीच्या मजुरांनी यात काही खोल्या तयार करून तेथेच राहण्यास प्रारंभ केला.
जमिनीखालील ही घरे पूर्णपणे फर्निश आणि सर्व सुखसुविधांनी युक्त आहेत. तेथे अशी सुमारे 1500 घरे आहेत. या गावात अनेक हॉलिवूड चित्रपटांचे चित्रिकरण होत असते. या ठिकाणी खाणकाम 1915 मध्ये सुरू झाले होते.
कूबर पेडी एक वाळवंटी भाग असल्याने येथे उन्हाळय़ात तापमान अत्यंत अधिक तर हिवाळय़ात खूपच कमी असते. याचमुळे येथे राहणाऱया लोकांना मोठय़ा अडचणींना तोंड द्यावे लागत होते. लोकांना खाणकामानंतर रिकामी पडलेल्या खाणींमध्ये हलविण्याचा यावर तोडगा काढण्यात आला. उन्हाळय़ात येथील तापमान 120 अंश फॅरेनहाइटपर्यंत पोहोचते आणि या ठिकाणी पाऊसही खूपच कमी पडतो.
या गावात ठिकठिकाणी जमिनीवर बाहेर पडणाऱया चिमण्या आहेत. तसेच अनेक फलकही लावण्यात आले आहेत. सावधगिरी बाळगून चाला अन्यथा जमिनीच्या आतील घरात कोसळाल किंवा एखाद्या गुहेत जाल असा इशारा या फलकांद्वारे देण्यात आला आहे.
या भूमिगत घरांमध्ये इंटरनेट, वीज, पाणी यासारख्या सर्व सुविधा आहेत. जर तेथे काही नसेल तर ते म्हणजे ऊन. जमिनीवरून पाहिल्यास ही घर आतून कशी असेल याचा अंदाज लागत नाही. या गावात एक भूमिगत हॉटेल देखील असून तेथे तुम्ही 150 डॉलर्स खर्च करून रात्रीचे वास्तव्य करू शकता. तेथील सुपरमार्केट देखील भूमिगतच आहे. याचबरोबर तेथील क्लबमध्ये पूल गेम खेळण्याचा आनंद घेता येतो.