प्रतिनिधी- बांदा
इन्सुली पागावाडीत जमिनीच्या बांधावरुन दोन भावांमध्ये हाणामारी झाली. यावेळी लहान भावाने मोठ्या भावावर फावड्याने वार केल्याने हाताची करंगळी तुटून मोठा भाऊ गंभीर जखमी होण्याची घटना आज सकाळी घडली. यामध्ये तुकाराम धोंडू पाटील (३३) यांच्या हाताची करंगळी तुटली असून कपाळावर दांड्याचा वार बसल्याने तीन टाके पडले आहेत. याबाबतची फिर्याद बांदा पोलिसात दाखल असून बांदा पोलिसांनी शाहू उर्फ संदीप धोंडू पाटील (३०) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इन्सुली – पागावाडी येथील शेतीत तुकाराम पाटील हे नांगरणी करत असताना त्यांचा लहान भाऊ त्याठिकाणी येत आपल्यालाही जमीन पाहिजे असे सांगून भांडण करण्यास सुरुवात केली. यावेळी दोन्ही भावांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. बाचाबाचीचे पर्यावसान हाणामारीत झाले.
संशयित शाहू याने फावड्याने तुकाराम याच्यावर हल्ला केला. यातून वाचण्यासाठी त्यांनी उजवा हात पुढे केला. मात्र फावड्याचा घाव बसल्याने त्यांच्या हाताची करंगळी तुटून पडली. त्यानंतर शाहू याने लाकडी दांड्याने डोक्यावर वार केला. त्यानंतर तुकाराम यांनी आरडाओरडा करताच शाहू हा पळून गेला अशी फिर्याद बांदा पोलीसात दाखल झाली आहे. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.