वारखंडे-फोंडा येथील प्रकार : तक्रारी करुनही कारवाई नाही
प्रतिनिधी / फोंडा
फोंडा पालिकेच्या वारखंडे प्रभागाचे नगरसेवक प्रदीप नरसिंह नाईक यांनी आपल्या जमिनीत अतिक्रमण करुन घराचे बेकायदेशीर बांधकाम करीत असल्याची तक्रार वारखंडे येथील सुदेश जी. नाईक यांनी केली आहे. यासंबंधी फोंडा पालिका, पीडीए, पालिका संचालनालय तसेच दक्षता खात्याला तक्रारी देऊनही कुठलीच कारवाई होत नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
प्रदीप नाईक हे नगरसेवक असल्याने त्यांच्या राजकीय दाबावामुळे आपल्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. या उलट फोंडा उपजिल्हाधिकाऱयांकडून आपल्या विरोधात सार्वजनिक ठिकाणी सामान ठेवल्याप्रकरणी कारवाई केली जाते. प्रदीप नाईक यांच्या घराच्या बांधकामाला पीडीएची मान्यता नाही. भूखंडाचे सिमांकन न केल्याबद्दल बांधकामाचा सुधारीत परवाना अडवून ठेवण्यात आलेला आहे. तरीही शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी तसेच रात्रीच्यावेळी हे बांधकाम सुरु आहे, अशी माहिती सुदेश नाईक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. पाहणी अहवालामध्ये जमिनीची सर्व कागदपत्रे व अहवाल आपल्या बाजूने असतानाही गेले वर्षभर कुठलीच कारवाई होत नाही. सुदेश नाईक यांच्यासह कृष्णनाथ नाईक, दर्शन नाईक, सुर्यकांत नाईक व इतरांनी ही लेखी तक्रार केली आहे.
जमिनीच्या मालकीहक्काचे पुरावे आहेत ः प्रदीप नाईक दरम्यान, नगरसेवक प्रदीप नाईक यांनी जमिनीच्या मालकीहक्काची कागदपत्रे असल्याचे सांगून घराचे बांधकामही कायदेशीर असल्याचे सांगितले. वारखंडे येथील आपल्या वडिलोपार्जित शंभर वर्षे जुन्या घराच्या जागी नवीन बांधकाम सुरु आहे. त्यासाठी पीडीएचा परवाना व इतर सोपस्कार पूर्ण केले असून सुधारीत आरखडय़ाची रितसर परवानगी मागितली आहे. या जमिनीच्या मूळ जमिनदाराने 1993 साली सनग्रेस डेव्हलोपर्स यांना ही जमिन विकली होती. त्यावेळी मुंडकार म्हणून आपल्याला घराची जागा, अंगण व पायवाट सोडण्यात आली होती. मूळ जमिनदाराने तसा लेखी करार असून त्याची प्रत आपल्याजवळ आहे. तक्रारदार सुरेश नाईक यांनी जुना काँक्रिटचा मिक्सर आपल्या घरासमोर ठेवून पायवाट अडवली आहे. त्यामुळे आपली वाहने अंगणातून बाहेर काढता येत नाहीत. आपण कुठलाही राजकीय वशिला वापरलेला नाही. आपली पायवाट अडवल्याबद्दल कायदेशीर तक्रार केलेली आहे, असे प्रदीप नाईक यांनी सांगितले.