प्रतिनिधी / नागठाणे
वाट्याने केलेली जमीन कसण्याच्या कारणावरून अतीत(ता.सातारा) येथे दोन कुटुंबात झालेल्या धुमश्चक्रीत दोघे गंभीर जखमी झाले.या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील आठ जणांविरोधात रायटिंगचा गुन्हा दाखल केला आहे.हल्ल्यात दोन्ही कुटुंबाकडून कोयता,तलावारीचा वापर करण्यात आला.गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली.
याबाबत अंकुश शिवाजी सावेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते अतीत गावातील राजेंद्र शंकर यादव यांची गट नं.७१७ इनाम नावाची ९० गुंठे जमीन तीन वर्षांपासून वाट्याने कसत आहेत.गुरुवारी रात्री अंकुश सावेकर,जमीन मालक राजेंद्र यादव व त्यांची पत्नी मंदाकिनी राजेंद्र यादव हे पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते.यावेळी तेथे लक्ष्मण बाबुराव जाधव,प्रशांत लक्ष्मण जाधव,संतोष लक्ष्मण जाधव व संभाजी बबन जाधव हे गाडीतून तेथे आले.यावेळी लक्ष्मण जाधव यांनी ‘ सुधाकर शंकर जाधव व त्यांच्या आईच्या हिश्याची जमीन मी विकत घेतली असून तुम्ही पिकाला पाणी पाजू नका व पुन्हा जमिनीत येऊ नका नाहीतर जीवे मारून टाकू ‘ अशी धमकी देत गाडीतून कोयता काढून मारण्यास सुरवात केली.
यावेळी प्रशांत जाधव,संतोष जाधव व संभाजी जाधव यांनी लोखंडी पाईपाने मारण्यास सुरवात केली.मारहाणीत डोक्यात वार झाल्याने अंकुश सावेकर गंभीर जखमी झाले.जमीन मालक राजेंद्र यादव व त्यांची पत्नी सोडविण्यासाठी आले असता त्यानांही मारहाण केली.अंकुश सावेकर यांना उपचारासाठी नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
तर स्वप्नाली प्रशांत जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार इनाम शिवारातील गट नं.७१७ मधील ६० गुंठे जमीन आम्ही जमीन मालक सुधाकर शंकर यादव व त्यांच्या आईकडून विकत घेतली आहे.गुरुवारी रात्री जमिनीकडे कोणी जात तर नाही ना ? हे पाहण्यासाठी मी, माझे पती,सासरे,दीर,जमीनमालक सुधाकर शंकर यादव व गावातील संभाजी बबन जाधव गेलो असता तेथे राजेंद्र शंकर यादव, अंकुश शिवाजी सावेकर,सचिन शिवाजी सावेकर व शंभूराज राजेंद्र यादव हे आम्ही खरेदी केलेल्या जमिनीत पाणी पाजत असल्याचे दिसले.यावेळी त्यांना आमच्या खरेदी केलेल्या जमिनीत पाणी का पाजत आहात ? पाणी देणे बंद करा’ असे सांगितले असता राजेंद्र यादव यांनी ‘ कोर्टातुन वाटप पत्र घेऊन या असे म्हणाले.
यावेळी अंकुश सावेकर याने माझे केसाला धरून मारहाण केली तसेच माझ्या पतीलाही मारहाण केली.यावेळी आमच्या सोबत आलेल्या संभाजी जाधव यांच्या छातीवर अंकुश सावेकर याने तलवारीने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले.त्यांना उपचारासाठी नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असे म्हटले आहे. पोलिसांनी शुक्रवारी रात्री दोन्ही कुटुंबातील ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.