इस्लामपुरातील एका विरुद्ध गुन्हा ः पैशाची मागणी केल्यानंतर ठार मारण्याची धमकी
प्रतिनिधी/इस्लामपूर
पेठनाका येथील शोभा अशोक पाटील (वय 43) या महिलेच्या जमीन खरेदीपोटी येथील विजय विलास माने याने 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी त्याच्या विरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पेठ येथील सर्व्हे नं. 377/2 मधील तीन गुंठे जमीनीचा व्यवहार पाटील यांनी माने याच्यासोबत केला. हा व्यवहार 41 लाख 50 हजार रुपयांना ठरला होता. त्याप्रमाणे त्याने 22 जानेवारी 2015 रोजी करारपत्र केले. नोटरी करताना माने याने दीड लाख रुपये शोभा पाटील यांना उचल म्हणून दिले. 3 लाख रुपये 29 जानेवारी व उर्वरीत 37 लाख रुपये खरेदीपत्रावेळी देण्याचे ठरले होते. पण, त्याने तीन लाख रुपये दिले नाहीत. सर्व व्यवहार खरेदीपत्रावेळी पूर्ण करतो, असे त्याने सांगितले.
1 जून 2015 रोजी माने याने दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीपत्राने व्यवहार केला. त्यानंतर त्याने 40 लाख रुपये रक्कम देण्यास टाळाटाळ सुरु केली. त्यासाठी तगादा लावला असता, त्याने पैसे देणार नाही, पोलीस व कोर्ट माझ्या हातात आहे. जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी देण्यास सुरुवात केली. दरम्यान माने याने 3 गुंठे जमिनीसह पोटखराब 1-19 (199) चौमीटर या क्षेत्रासह आणखी सव्वा गुंठे अशी मिळून 5.42 आर व पोटखराब 1.23 हे क्षेत्र पत्नी प्रियांका माने हिच्या नावे बक्षीस पत्राने नोंद घातल्याचे दिसून आले. पाटील यांच्या नावावर 4.19 आर. क्षेत्र असताना बक्षीस पत्र व सात बारा सदरी 5.42 तसेच पोटखराब 1.23 हे त्याच्या पत्नीच्या नावे केल्याचे दिसून आले.
माने याने पाटील यांची 40 लाख रुपयांची फसवणूक केली. त्याने आणखी कुणाची फसवणूक केली असल्यास इस्लामपूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केले आहे.