पोलीस, स्थानिकही जखमी : मोपा विमानतळ लिंक रस्ताच्या जमीन मोजणीवेळी घटना
पेडणे (प्रतिनिधी )
मोपा विमानतळ लिंक रस्ताच्या जमीन मोजणीवेळी सोमवारी सायंकाळी तुळसकरवाडी येथे जमीन पीडित स्थानिकांकडून पोलिसांवर दगडफेक व प्रत्युत्तदाखल पोलिसांकडून लाठीचार्च झाला. यात पोलीस व स्थानिकही जखमी झाले.
मोपा विमातनळ प्रकल्पासाठी सुकेकुळण धारगळ ते मोपापर्यंत राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यासाठी स्थानिक शेतकऱयांचा विरोध डावलून सरकार पोलीस यंत्रणेला घेऊन रस्त्यासाठी जमीन संपादन करण्याची प्रक्रिया करत असून गेले अनेक दिवस अधूनमधून पोलीस संरक्षणात जमीन भूसंपादन विभागाचे अधिकारी तसेच संबंधित खात्याचे अधिकारी येऊन जमीन मोजमापन करत आहेत. आपली वडिलोपार्जित जमीन पिढय़ान पिढय़ा राखून ठेवली होती ती डोळय़ादेखत सरकार बळजबरीने हिसकावून घेत असल्याच्या निषेधार्थ गेले अनेक दिवस पीडित शेतकरी तसेच जमीन मालक यांच्यात संघर्ष सुरु आहे. यापूर्वीही आपल्या जमिनी राखून ठेवण्यासाठी मोपा पीडित शेतकऱयांना संघर्ष करताना अटकही झाली होती. माञ आपल्या जमिनी ह्या आमचे पोट असल्याने काजू उत्पादन तसेच अन्य उत्पादन साधन यापुढे बंद होणार यासाठी शेतकऱयांची लढाई सुरु आहे.
सोमवारी सायंकाळी तुळसकरवाडी येथे रानात भूसंपादन विभागाचे अधिकारी पोलीस संरक्षणात मोजमापन करत असताना शेतकरी व पोलीस यांच्यात संघर्ष झाला. पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर पोलिसांनीही लाठीचार्च केला. यात अनेक पोलीस तसेच स्थानिक आंदोलनकर्ते शेतकरी जखमी झाले.
अकरा पोलीस जखमी
उपनिरीक्षक रोहन नाईक , हवालदार अभिजीत गावडे , शिपाई साईदास बोर्डेकर, नागराज पाटील , सुबोध साळगावकर, महिला पोलीस मयूरी गावस , समृद्धी मापारी, आफ्रिन नादाफ, विनिता नाईक, नितू नाईक , प्रशांती नाईक हे पोलीस जखमी झाले.
आंदोलनकर्तेही मोठय़ा प्रमाणात जखमी
आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यात झालेले लाठीचार्च व दगडफेक यात अनेक महिला तसेच पुरुष जखमी झाले.त्यांना उपचारासाठी कासारवर्णे येथे आरोग्य केंद्रावर नेण्यात आले. तेथून काहीना म्हापसा येथे आझिलो इस्पितळात त्यांना उपचारासाठी पाठविण्यात आले. आंदोलन करणाऱया एका व्यक्तीला पेडणे पोलिसांनी ताब्यात घेत पेडणे पोलीस स्थानकावर आणले असता वातावरण आणखीनच बिघडले.