पुजारी वस्ती ढालगाव येथील प्रकार
प्रतिनिधी / सांगली
जमीनीच्या वादातून कुऱ्हाडीने हल्ला करून खून केल्याप्रकरणी सुखदेव बाळकू घागरे वय 50 रा. पुजारी वस्ती, ढालगाव याला जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच पाच हजार रूपये दंड ही ठोठावण्यात आला आहे. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अरविंद देशमुख आणि सहाय्यक सरकारी वकील श्रीमती आरती देशपांडे यांनी काम पाहिले.
याबाबत हकीकत अशी की, ढालगाव पुजारी वस्ती येथे मयत श्रीमंत दामू पुजारी आणि त्यांच्या भावकीकडे 25 एकर जमीन कुळकायद्याने कसण्यास होती. त्यातील साडेबारा एकर जमीन ही मुळ मालकाने आरोपी सुखदेव बाळकू घागरे यांना परस्पर विकली होती. त्यातून पुजारी आणि घागरे या दोन्ही कुंटुंबांमध्ये वाद सुरू होता. याबाबत दिवाणी न्यायालयात सुनावणीही सुरू होती. दरम्यान, दोन मे 2016 रोजी सांयकाळी सहाच्या सुमारास या शेताच्या बाजूला मयत श्रीमंत पुजारी आणि त्याचा चुलत भाऊ थांबले होते. त्यावेळी श्रीमंत यांचा भाऊ बाजूला व्यायाम करण्यासाठी गेला असताना आरोपी सुखदेव घागरे आणि त्याचा साथीदार शंकर घागरे त्याठिकाणी आले आणि त्यांनी श्रीमंत पुजारी याला पकडले आणि त्याला काही समजण्याच्या आधीच सुखदेव घागरे यांनी त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने जोरदार हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले त्याचवेळी जखमी पुजारी यांचा चुलत भाऊ त्याठिकाणी आला आणि त्यांनी हे पाहिले. त्यावेळी तो जागीच मयत झाला होता.
याबाबत मयत श्रीमंत पुजारी यांच्या चुलतभावाने सुखदेव घागरे आणि शंकर घागरे यांच्याविरोधात खूनाचा गुन्हा कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दाखल केला होता. या खूनाचा तपास पोलीस अधिकारी श्रीरसागर यांनी केला आणि या आरोपींविरोधात आरोप पत्र दाखल केले होते. त्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू होती. याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी सुखदेव घागरे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.