100 मीटर्सपाठोपाठ 200 मीटर्समध्येही यश, दोन्ही इव्हेंटमध्ये जेतेपद कायम राखणारी पहिली महिला ऍथलिट
जमैकाच्या इलेन थॉम्पसनने मंगळवारी महिलांच्या 200 मीटर्स धावण्याच्या शर्यतीतील सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला. यापूर्वी शनिवारी ती 100 मीटर्स फायनलच्या पोडियमवर देखील होती. ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर्स व 200 मीटर्सचे जेतेपद कायम राखणारी ती आजवरची पहिली महिला ऍथलिट आहे.
मंगळवारी इलेन थॉम्पसन हिने 200 मीटर्स इव्हेंट जिंकत जागतिक स्तरावर आपणच स्प्रिन्ट क्वीन असल्याचे अधोरेखित केले. नॅशनल स्टेडियमवर झालेल्या या इव्हेंटमध्ये तिने 21.53 सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण संपादन केले. नामिबियाची 18 वर्षीय ख्रिस्तिन मबोमा ही 21.81 सेकंद वेळेसह रौप्य जिंकण्यात यशस्वी ठरली. अमेरिकेची गॅबी थॉमस 21.87 सेकंद वेळेसह कांस्यपदकाची मानकरी ठरली. 100 मीटर्समधील रौप्यजेती शेली-ऍन-प्रेजर-प्राईस हिला मात्र या इव्हेंटमध्ये 21.94 सेकंद वेळेसह चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले.
ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर्स व 200 मीटर्स इव्हेंटचे जेतेपद कायम राखण्याचा पराक्रम यापूर्वी एकाही महिला ऍथलिटला शक्य झालेला नाही. त्यामुळे, थॉम्पसन हिच्या या कामगिरीला ऐतिहासिक महत्त्व आहे. इलेन थॉम्पसन हिने मंगळवारी 200 मीटर्सच्या या इव्हेंटमध्ये प्रारंभापासूनच आघाडी राखली. मात्र, शेवटच्या 30 सेकंदात नामिबियाच्या ख्रिस्तिनने मुसंडी मारण्याच्या दिशेने केलेली आगेकूच थॉम्पसनसाठी चिंतेची ठरली. गॅबी थॉमसने 0.06 सेकंद या अगदी किंचीत फरकाने शेली ऍन पेजर प्राईसला मागे टाकत कांस्यपदक मिळविले.