निविदा प्रक्रियाच्या हालचाली गतिमान
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाचा जिह्यात वाढत चाललेला प्रादुर्भाव पहाता रुग्णांना उपचार देण्यासाठी आणि बेडची सोय व्हावी याकरता पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा येथे जम्बो हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार ते हॉस्पिटल सातारा बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या हजेरी माळावर उभ्या असलेल्या छ.शिवाजी महाराज संग्रहालयात सुरू करण्याची जयत तयारी चाललेली आहे.अंतर्गत बाबीकरता निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.तज्ञ डॉक्टर, नर्सेस यांची ही नेमणूक करण्यात येणार आहे.ऑक्सिजनसह 250 बेड व 50 बेड आयसीयू असणार आहेत.जिल्हाधिकारी शेखर सिंह हे रुग्ण कल्याण कमिटीचे अध्यक्ष आहेत.त्यामुळे त्यांच्याकडेच त्या हॉस्पिटलची सर्व सूत्रे आहेत.
कोरोनामुळे सातारा जिह्यातील सर्व रुग्णालयात हाऊसफुल अशी अवस्था आहे.कोणत्याही हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उपचार घेण्यासाठी बेड शिल्लक नाही.खाजगी हॉस्पिटलमध्ये तीच अवस्था आहे.रुग्णांना योग्य प्रकारचे उपचार मिळावेत यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या जिह्यात जम्बो हॉस्पिटल सूरु करण्याचा मानस व्यक्त केला आणि त्यानुसार लगेच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची पाहणी केली.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सूचना देताच जिल्हा आरोग्य यंत्रणा जम्बो हॉस्पिटल सुरू करण्याच्या कार्यवाहिला लागले. छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी संग्रहालयात अगोदर स्वच्छता करून घेण्यात आली.बाजूच्या परिसरातले गवत काढून घेण्यात आले.रुग्णालयासाठी लागणारे फर्निचर तातडीने आणण्यासाठी निविदा काढण्यात आल्या.काही उघडण्यात आल्या तर काहींची प्रक्रिया सुरू आहे.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये आणि जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांना सूचना देण्यात आल्या.त्यानुसार जिल्हा आरोग्य विभाग त्या कामाला लागला आहे.
कार्यवाही सूरु आहे
याबाबत अगोदर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.मात्र,संपर्क होऊ शकला नाही.जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.