ऑनलाईन टीम / पुणे :
जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी येथील परिस्थिती व व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे. जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगून येथील बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचवण्यात व उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
पुण्यातील विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थितीबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.
पुणे आणि पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. उपमुख्यमंत्री म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रातून पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी कोरोना बाधित रुग्ण दाखल होत आहेत. कोरोनाच्या रुग्णांना वेळेत व योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेने पूर्ण ताकदीनिशी काम करावे. कोरोना परिस्थती नियंत्रणासाठी राज्य शासन सर्व प्रकारे मदत करत असून दोन्ही महापालिकेच्या आरोग्य विभागाने देखील सक्रियपणे काम करावे.
विभागातील कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागू नये, यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील 50 टक्के निधी कोविड नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी वापरुन कोरोना रोखण्यासाठी प्रभावीपणे काम करावे, असे सांगून ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत उपचार मिळवून देण्याचे नियोजन करावे तसेच आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना रुग्णांवर उपचार होत असल्याची खात्री करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.