मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करणार ऑनलाईन लोकार्पण : कोरोना लढय़ाला मिळणार बळ
प्रतिनिधी / सातारा
ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा जिल्हय़ाला दिलासा देणारा ठरला आहे. बाधितांचा आकडा घटत असून कोरोनामुक्तीचा वेग चांगला असल्याने गेल्या सहा महिन्यात प्रथमच शासकीय यंत्रणा काहिशी तणावमुक्त होऊ लागली आहे. बेडचा मुद्दा आता राहिलेला नसला तरी प्रशासनाने सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात जम्बो कोविड हॉस्पीटलची उभारणी पूर्ण केली आहे. शुक्रवार 9 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. यानिमित्ताने कोरोनामुक्तीच्या लढय़ाला आणखी बळ मिळणार आहे. बुधवारी रात्रीच्या अहवालात …इतके रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात 511 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान मात्र कायम आहे.
याच आठवडय़ात जम्बो कोविड हॉस्पिटल सुरू होणार असल्याचे संकेत ‘तरूण भारत’ने दिले होते. जिल्हय़ाची आव्हानात्मक परिस्थिती पाहता प्रशासनानेही रात्रंदिवस प्रयत्न करून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील सुसज्ज कोविड हॉस्पीटलची उभारणी पूर्ण केली आहे. शुक्रवारी दुपारी 2 वाजता या हॉस्पिटलचे ऑनलाईन उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर असून पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह जिल्हय़ातील सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हॉस्पीटलमध्ये 234 ऑक्सिजन बेड व 52 आयसीयु बेड आहेत. डायलिसीसच्या रूग्णांना 4 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
511 नागरिकांना डिस्चार्ज
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 511 नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्हय़ाची रिकव्हरी कालच्या आकडेवारीनुसार 77.69 टक्के असून आतापर्यंत 31 हजार 470 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या काही दिवसांत बाधितांचा आकडा कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांपेक्षा कमी येत आहे, ही दिलासादायक बाब आहे.
27 बाधितांचा मृत्यू
कोरोनाचा फटका सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांना बसला आहे. बाधितांचा वेग मंदावला असला तरी मृत्यूची संख्या घटत नसल्याचे चित्र दिसत आहे. बुधवारी 27 जणांचा मृत्यू झाला. मृत्यूदर 3.16 टक्क्यांवर पोहोचला असून तो कमी होणे आता महत्वाचे आहे. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार सोनगाव (ता. सातारा) येथील 85 वर्षीय पुरुष, वेळेकामटी (ता. सातारा) येथील 49 वर्षीय पुरुष, वडूज (ता. खटाव) येथील 65 वर्षीय पुरुष, शिरवळ (ता. खंडाळा) येथील 82 वर्षीय पुरुष, सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, यादोगोपाळ पेठ (ता. सातारा) येथील 54 वर्षीय पुरुष, न्यु एमआयडीसा (सातारा) येथील 82 वर्षीय पुरुष, एकसळ (ता. कोरेगाव) येथील 7 दिवसीय बालक, मल्हारपेठ (ता. सातारा) येथील 76 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ (सातारा) येथील 75 वर्षीय महिला, आदर्की खुर्द (फलटण) येथील 75 वर्षीय पुरुष, लिंब (ता. सातारा) येथील 70 वर्षीय महिला. विविध खासगी हॉस्पीटलमध्ये शिवथर (ता. सातारा) येथील 65 वर्षीय पुरुष, शाहुपुरी (ता. सातारा) येथील 83 वर्षीय महिला, हणमंतनगर (ता. फलटण) येथील 65 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 57 वर्षीय पुरुष, कराड येथील 75 वर्षीय पुरुष, शिवडे (ता. कराड) येथील 73 वर्षीय महिला. तर उशिरा कळविलेले जिल्हा रुग्णालय, सातारा येथे विठ्ठलनगर खेड येथील 85 वर्षीय महिला, कराड तालुक्यातील चोरे येथील 60 वर्षीय महिला, येळगाव येथील 45 वर्षीय पुरुष, बेलवडे येथील 60 वर्षीय महिला, हवेली येथील 62 वर्षीय महिला, कोणेगाव येथील 76 वर्षीय पुरुष, हेळगाव येथील 65 वर्षीय पुरुष, वडोली निलेश्वर येथील 77 वर्षीय पुरुष, यशवंतनगर येथील 55 वर्षीय महिला, अशा एकुण 27 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
725 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
बुधवार जिल्हय़ातून 725 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 80, कराड 18, उपजिल्हा रुग्णालय फलटण 34, कोरेगाव 31, वाई 57, खंडाळा 47, रायगांव 59, पानमळेवाडी 164, मायणी 11, महाबळेश्वर 22, दहिवडी 18, खावली 21, तळमावले 47, म्हसवड 39, पिंपोडा 10 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 67 असे एकुण 725 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे.