प्रतिनिधी/ सातारा
कोरोना बाधितांची गैरसोय होवून नये म्हणून जम्बो कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले. या हॉस्पिटल च्या परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आली होती. मात्र प्रशासनाने पुन्हा दुर्लक्ष केल्याने येथे खाद्य विक्रेत्यांच्या रांगा लागल्या आहेत. दिवसभर येणाऱया ग्राहकांकडून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे.
कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने जिल्हा रूग्णालय ते खाजगी रूग्णालयात बेडची कमतरता निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर जम्बो कोविंड रूग्णालय उभारण्यात आले. या रूग्णालयाच्या परिसरात अतिक्रमण, पार्किंग न करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिले होते. मात्र काही दिवस या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. त्या नंतर पुन्हा खाद्य विक्रेत्यांनी हातगाडे लावण्यास सुरूवात केली. यामुळे पुन्हा अतिक्रमणात भर पडली आहे. अतिक्रमण हटावची मोहीम ठराविक ठिकाणीच राबविण्यात येत असल्याने या विक्रेत्यांना यांची धास्ती उरलेली नाही. तसेच ग्राहकांची संख्या वाढत असून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. पार्किंग रस्त्यालगत करण्यात येत असल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे.