ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील कानाचक भागात संशयास्पद ड्रोनच्या हालचाली दिसून आल्या. त्यानंतर या संपूर्ण भागात शोधमोहीम सुरू करण्यात आली. सुरक्षा दलांव्यतिरिक्त अन्य तपास एजन्सी या भागात तैनात करण्यात आल्या आहेत.
मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास सीमा पोलिस चौकी संधवा येथील गावकऱयांनी आकाशात ड्रोन पाहिले. गावकऱयांनी याची माहिती पोलिसांना देताच मौनी चक पोलीस चौकीचे पथक सीमा पोलीस चौकी संधवा व्यतिरिक्त रात्री उशिरा या भागात पाठविण्यात आले. तसेच बीएसएफचे जवानही तेथे पोहोचले. त्यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत या भागात शोधमोहिम सुरू होती. यापूर्वी या भागात ड्रोन दिसल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.