दोन्ही पायलट सुरक्षित : तांत्रिक बिघाडाचे कारण
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मूतील रुद्रनाला या निवासी भागामध्ये लष्कराचे एक हेलिकॉप्टर आपत्कालीन लँडिंग करताना कोसळले. हेलिकॉप्टरचे दोन्ही पायलट सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे लष्कर व स्थानिक पोलिसांनी सांगितले. हे हेलिकॉप्टर नियमित प्रशिक्षणासाठी उधमपूर येथून निघाले होते.
लष्कराच्या एका पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण आणले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी पायलटला सुरक्षितस्थळी हलवले. जम्मूतील परिसरातील रुद्रनाला भागात ही दुर्घटना घडली. लष्कराचे चीता हे हेलिकॉप्टर नियमित सरावासाठी उधमपूर येथून निघाले असताना हा अपघात झाला. तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने पायलटने हेलिकॉप्टर उतरवण्याचा निर्णय घेतला. तथापि ते जमिनीवर पोहोचण्याआधीच क्रॅश झाले. दुर्घटनेनंतर पायलट्सना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
हेलिकॉप्टर पडल्याची माहिती मिळताच अरनास पोलिसांचे एक पथक तसेच सेनादलाची पथकही घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेचा उपाय म्हणून परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. तसेच हेलिकॉप्टरजवळ जाण्यासही निर्बंध करण्यात आला. सेनादलाने या प्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देऊन चौकशीही सुरु केली आहे.