ऑनलाइन टीम / सातारा :
मराठा लाईट इंफ्रंट्रीतील जवान नाईक संदीप रघुनाथ सावंत नौशेरा जम्मू-काश्मीर येथे झालेल्या चकमकीत हुतात्मा झाले. ते सातारा जिह्यातील कराड तालुक्यातील मुंडे गावचे रहिवासी होत.
नववर्षाच्या पहाटे संदीप यांच्या गस्ती चमूला नियंत्रण रेषेवरील जंगलात हालचाली दिसल्या. सावंत यांच्यासह अन्य गस्ती चमूतील अन्य सहकारी तात्काळ सज्ज झाले. त्यावेळी दहशतवादी घुसखोरी करीत असल्याचे दिसले. संदीप यांनी आघाडीवर जात हल्ला चढवला. त्या दरम्यान झालेल्या गोळीबारात ते व नेपाळमधील गोरखा रायफल्सचे जवान अर्जुन थापा मगर हे गंभीर जखमी झाले. त्यात या दोघांना वीरमरण आले.
29 वषीय संदीप 9 वर्षांपूर्वी ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. 18 मराठा बटालियनमध्ये समाविष्ट असलेल्या संदीप सावंत यांनी भरतीनंतर राजस्थान आणि जम्मू काश्मीर येथे सेवा बजावली होती. सुमारे दीड वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला असून त्यांना एक मुलगी आहे. तसेच आई – वडील, चुलते, चुलत भाऊ, बहिण असा त्यांचा परिवार आहे.