जम्मू / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्हय़ात एका चकमकीत दहशतवाद्यांनी एका विशेष पोलीस अधिकाऱयाची (एसपीओ) हत्या केली आहे. इश्फाक अहमद असे या अधिकाऱयाचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. या हल्ल्यात या अधिकाऱयाचा भाऊही जखमी झाला. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. चौकशी सुरु करण्यात आली.
अहमद यांच्या घरात घुसून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यावेळी त्यांचा भाऊ जान त्यांच्यासह होता. गोळय़ा वर्मी लागल्याने अहमद यांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांची संख्या दोन ते तीन असावी असे अनुमान आहे. अहमद यांचा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून लौकिक होता.
प्रदेशाच्या भाजप शाखेने या हत्येचा निषेध केला आहे. दशहतवादी वैफल्यग्रस्त झाले असून ते आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी घरी रजेवर आलेल्या पोलिसांचे बळी घेत आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये पोलीस आणि सेनेने अनेक दहशतवाद्यांना ठार केले असून त्यांच्या टोळय़ा उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांना नैराश्याने ग्रासले आहे, असे प्रतिपादन करण्यात आले. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स कॉन्फरन्स या पक्षांच्या पदाधिकाऱयांनीही निषेध केला आहे .
सेनातळाजळ स्फोट
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा विभागातील सेनेच्या तळाजवळ एक स्फोट करण्यात आला आहे. मात्र त्यात कोणतीही जिवीत किंवा वित्तहानी झालेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले. हा तळ 21 राजपुताना रायफल्स या तुकडीचा होता. स्फोटाच्या चौकशीचे आदेश देण्यात आला आहे. अद्याप याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. हा जिलेटीन कांडीचा स्फोट असावा अशी चर्चा आहे.