ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग आणि बंदीपोरा येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले.
अनंतनागमध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली होती. त्यानुसार जम्मू पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा शोधमोहिम हाती घेतली. दरम्यान, लपलेल्या दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार सुरू केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटली नसून, त्याच्या ताब्यातील पिस्तूल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले. या कारवाईत एक पोलीसही जखमी झाल्याचे काश्मीर झोनमधील पोलिसांनी सांगितले.
तर बंदिपोरा येथे लष्कर 13-आरआर (राष्ट्रीय रायफल्स) आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने गुंड जहांगीर भागात दहशतवाद्यांची माहिती घेऊन शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. अनेक तास चाललेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. इम्तियाज अहमद डार असे त्याचे नाव आहे. तो टीआरएफचा दहशतवादी होता.