सैन्य, वायूदलाने तंगधार भागामधून 7 रुग्णांना केले एअरलिफ्ट
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टीदरम्यान भारतीय सैन्य लोकांसाठी संकटमोचक ठरले आहे. सैन्य आणि भारतीय वायुदलाने केंद्रशासित प्रदेशाच्या तंगधार भागातून 6 वर्षीय मुलीसह 7 रुग्णांना एअरलिफ्ट केले आहे. सैन्यानुसार रुग्णांना तंगधार येथून कुपवाडा जिल्हा रुग्णालयात पोहोचविण्यात आले आहे.
तंगधार भागात मागील 3 दिवसांपासून जोरदार हिमवृष्टी होत आहे. पूर्ण भाग हिमाच्छादित झाला असल्याने रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली आहे. स्थानिक लोकांच्या मदतीकरता पूर्णपणे तयार असल्याचे सैन्याकडून म्हटले आहे.
स्थानिक प्रशासनाने साधला संपर्क
तंगधारच्या स्थानिक प्रशासनाने संपर्क साधला होता. या भागातील 7 रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांना लवकरात लवकर रुग्णालयात हलवावे लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. या रुग्णांमध्ये एका 6 वर्षीय मुलीचा समावेश होता, अशी माहिती सैन्याने दिली आहे.
मिग-19 द्वारे मोहीम
माहिती मिळताच सैन्याने त्वरित पावले उचलत मिग-19 द्वारे मोहीम फत्ते केली आहे. योग्यवेळी स्थानिक प्रशासनाकडून सैन्य आणि वायुदलाला कळविण्यात आल्याने लोकांचा जीव वाचविता आला आहे. अलिकडेच कुपवाडा येथील करालपुरामध्ये सैनिकांनी गरोदर महिलेला तिच्या घरापासून 2 किलोमीटर अंतरावरील मुख्य मार्गापर्यंत उचलून नेत रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचविले होते. तेथून महिलेला रुग्णालयात नेण्यात आले, जेथे तिने मुलाला जन्म दिला होता.