ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू -काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील बडू वनक्षेत्रात असलेले दहशतवाद्यांचे दोन तळ भारतीय जवानांनी उद्ध्वस्त केले. तसेच दहशतवाद्यांकडील मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त केला आहे.
अवंतीपोरा परिसरातील बडू आणि बार्सो वनक्षेत्रात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जम्मू पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लष्कराच्या तुकड्यांसह पोलिसांनी बुधवारी रात्री या भागात शोध मोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान, सुरक्षा दलांना गुरुवारी दोन दहशतवादी तळ आढळले, ते नष्ट करण्यात आले. त्या ठिकाणांहून एके 47 रायफलचे 1918 काडतूस, दोन ग्रेनेड, एक यूजीबीएल थ्रोअर, चार यूजीबीएल, अमोनियम नायट्रेट यासह घरगुती गॅस स्टोव्ह, गॅस सिलेंडर आणि 5400 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
लष्कराच्या 50-आरआर, सीआरपीएफ बटालियन-130 आणि अवंतीपोरा पोलिसांनी ही कारवाई केली.