ऑनलाईन टीम / सोपोर :
जम्मू-काश्मीरमधील सोपोर भागात रात्रभर जवान व दहशतवाद्यांमध्ये चाललेल्या चकमकीत अखेर लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. या दोन दहशतवाद्यांमध्ये एकजण हा लष्कर ए तोयबाच्या टॉपच्या कमांडर होता, अशी देखील माहिती समोर आली आहे.
काश्मिरचे आयजीपी विजय कुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागातील वारपोरा गावात काल रात्री चकमक सुरू झाली होती. या कारवाईत ठार करण्यात आलेला एक दहशतवादी फयाज वार हा लष्कर ए तोयबाचा टॉपचा कमांडर होता. तो जवान व नागरिकांवर झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांसाठी देखली जबाबदार होता.
जवानांनी चकमकीदरम्यान एका दहशतवाद्यांचा काल रात्री उशीरा खात्मा केला. तर, आज पहाटे दुसऱ्या दहशतवाद्याला ठार केले. सध्या परिसरात शोधीमोहीम सुरू आहे.
या अगोदरही जम्मू-काश्मीरच्या शोपियान येथे सुरक्षा दलाच्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या एका टॉप कमांडरला ठार करण्यात आले होते. त्या अगोदर दोन दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये अशाच प्रकारच्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले होते.