ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू विमानतळावरील तांत्रिक विभागात मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरात दोन स्फोट झाले. त्यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला. दरम्यान, फॉरेन्सिक आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी तपास सुरू केला आहे. विमानतळाजवळ स्फोट घडवून आणण्यासाठी दोन ड्रोनचा वापर करण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
स्फोट झालेल्या ठिकाणाहून हवाई दलाचे संपूर्ण कामकाज चालत होते. स्फोटात दोन जण जखमी झाले असून, एका इमारतीच्या छताचे किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने तेथील कोणत्याही उपकरणाचे नुकसान झालेले नाही. या घटनेनंतर जम्मूमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.