चेन्नई / वृत्तसंस्था
रणजी चषक स्पर्धेत इलाईट क गटातील साखळी सामन्यात कर्नाटकविरुद्ध 508 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जम्मू व काश्मीर संघाची दुसऱया डावातील स्थिती 4 बाद 189 अशी झाली. कर्णधार इयान देव सिंग चौहान 65 तर अब्दुल समद 21 धावांवर खेळत होते. या लढतीतील दुसऱया डावात जम्मू व काश्मीर संघाला आणखी 318 धावांची आवश्यकता असणार आहे.
जम्मू व काश्मीरच्या पहिल्या डावात 6 बळी घेणाऱया जलद गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने कमरान इक्बालला (4) बाद करत पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला आणि त्यानंतर श्रेयस गोपालने जतिन वाधवान (15) व शुभम सिंग (9) यांना बाद करत प्रतिस्पर्ध्यांची स्थिती 3 बाद 57 अशी केली. फझिल रशिद (65) व इयान सिंग यांनी चौथ्या गडय़ासाठी 79 धावांची भागीदारी साकारली. रशिद बाद झाल्यानंतर अब्दुल समद व सिंग यांनी आणखी 63 धावांची अभेद्य भागीदारी साकारताना आणखी पडझड होणार नाही, याचीही काळजी घेतली.
तत्पूर्वी, 2 बाद 128 या मागील धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात करताना कर्नाटकने आक्रमक पवित्र्यावर भर देत 29 षटकात 170 धावा जोडल्या. करुण नायरने येथेही धडाकेबाज फलंदाजी करत नाबाद 71 धावा फटकावल्या. केव्ही सिद्धार्थने 72 धावांचे योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक
कर्नाटक पहिला डाव ः 302. जम्मू व काश्मीर पहिला डाव ः सर्वबाद 93. कर्नाटक दुसरा डाव ः3 बाद 298 घोषित. जम्मू व काश्मीर दुसरा डाव ः 4 बाद 189. (इयान देव सिंग नाबाद 65, फझिल रशिद 65. श्रेयस गोपाल 3-90).