ऑनलाईन टीम / जम्मू :
श्रीनगरमधील दहशतवाद्यी कारवायांचा नायनाट करण्यासाठी आता सीआरपीएफने पहिल्यांदाच एका महिला आयपीएस अधिकाऱ्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सन 1996 च्या बॅचमधील तेलंगण केडरच्या आयपीएस अधिकारी चारू सिन्हा आता श्रीनगर सेक्टरमध्ये सीआरपीएफच्या महानिरीक्षक (आयजी) म्हणून काम पाहणार आहेत.
यापूर्वी चारू सिन्हा या सीआरपीएफ बिहार सिक्टरच्या महानिरीक्षक होत्या. त्यांच्या नेतृत्वात नक्षलवादाविरोधात अनेक अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले आहेत. बिहार नंतर त्यांची बदली महानिरीक्षक म्हणून जम्मू केली गेली. त्यानंतर आता त्यांच्याकडे श्रीनगर सेक्टरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सीआरपीएफच्या श्रीनगर सेक्टरमध्ये काश्मीरलगतचे तीन जिल्हे गांदरबल, बडगाम आणि श्रीनगरसह केंद्रशासीत प्रदेश लडाखचा समावेश आहे. वर्ष 2015 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या सेक्टरमध्ये पहिल्या आयपीएस महिला असतील ज्यांना दहशतवादग्रस्त या भागांमध्ये सीआरपीएफच्या अभियानांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
या सेक्टरमध्ये 2 रेंज, 22 कार्यकारी युनिट आणि 3 महिला कंपनी येतात. या भागात येणाऱ्या सर्व अभियानांचे नेतृत्व आता चारू सिन्हा यांच्याकडे असणार आहे.