मुंबई / ऑनलाईन टीम
गृहमंत्रिपदाचा पदभार राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी नुकताच स्वीकारला आहे. यानंतर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. याचेच औचित्य साधून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी वळसे पाटील यांच्यासोबतचा तरुणपणीचा ब्लॅक अँण्ड व्हाईट फोटो शेअर करत काही आठवणींना उजाळा दिला आहे. हा फोटो पाहताच या दोघांच्यात असणाऱ्या दृढ मैत्रिचे दर्शन होते.
जयंत पाटील यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यासोबतचा तरुणपणीचा ब्लॅक अँण्ड व्हाईट फोटो शेअर करत म्हटले आहे की, माझे जुने मित्र ना. दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार आज स्वीकारला. कडक शिस्त, कायद्याची सखोल जाण असणारे ते प्रशासक आहेत. ज्या खात्यात काम केले तिथे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आता या नवीन जबाबदारीसाठीही त्यांना मनापासून शुभेच्छा!
इस्लामपूरातील युवक मेळाव्यातील या दोघांचा हा फोटो आहे. हा फोटो या दोन नेत्यांच्यामधील मैत्रिचे दर्शन घडवतो. सोशल मीडियावर नेटकऱ्य़ांनी या दोघांच्या मैत्रिचे कौतुक केले आहे तसेच दिलीप वळसे पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दिलीप वळसे-पाटील यांनी आज राज्याचे नवे गृहमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नवी जबाबदारी दिल्याबद्दल आभार मानले. तसेच पारदर्शक कारभार महाराष्ट्राला देण्याचा माझा प्रयत्न असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.