क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
जयपूरात झालेल्या राष्ट्रीय हौशी बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत गोव्याच्या इथॅन आणि एड्रिक या वाझ बंधूनी शानदार कामगिरी केली. या कामगिरीच्या बळावर आता या दोघांनीही आशियाई आणि विश्व बुद्धिबळ स्पर्धेत खेळण्याची पात्रता मिळविली आहे.
10 वर्षीय इथॅन वाझने 2000 इलो गुणांच्या विभागातील स्पर्धेत तिसरे स्थान प्राप्त केले. या स्पर्धेत इथॅनला सुवर्ण आणि रौप्यपदक मिळालेल्या 33 वर्षीय प्रदीप तिवारी आणि कर्नाटकच्या अपूर्व कांबळे यांच्याकडून पराभव स्वीकारावे लागले. त्याने एम. के. चंद्रशेखरला बरोबरीत रोखले तर स्टॅन्ली सॅम्सनचा पराभव केला.
एड्रिक वाझने या स्पर्धेत 1700 इलो गुणाखालील गटात भाग घेतला होता. एकूण 9 फेरीमध्ये त्याने 7 गुणांची कमाई केली व सातवे स्थान प्राप्त केले. त्याने गौरव कठुरिया, उत्तरप्रदेशच्या कुलदीपचा आणि राजस्थानच्या नारायण जोशीचा पराभव केला.