बेंगळूर / वृत्तसंस्था
प्रो कबड्डी लीग 8 व्या आवृत्तीतील साखळी सामन्यात जयपूर पिंक पँथर्स व बेंगळूर बुल्स संघांनी एकतर्फी विजय संपादन केले. जयपूर पिंक पँथर्सने पाटणा पायरेट्सला 38-28 तर बेंगळूर बुल्सने गुजरात जायंट्सला 46-37 अशा फरकाने पराभवाचे धक्के दिले.
रायडर दीपक हुडाने सुपर-10 व अर्जुन देस्वालने 9 गुणांसह जयपूर पिंक पँथर्सच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पाटणाच्या खेळाडूंना अजिबात सूर सापडला नाही. या लढतीच्या माध्यमातून पाटणा संघाची कमकुवत बाजू चव्हाटय़ावर आल्याने प्रशिक्षक राम मेहर सिंग यांच्यासाठी ही चिंतेची बाब असेल.
उभय संघातील ही लढत पहिल्या सत्रात समसमान स्तरावर रंगत गेली. मोनू गोयतने पायरेट्सतर्फे उत्तम खेळ साकारला तर बहरातील दीपक हुडाने पँथर्सकडून लक्षवेधी राईड नोंदवले. पहिल्या 10 मिनिटात उभय संघात 10-10 अशी बरोबरी होती. त्यानंतर दुसऱया सत्रात जयपूर पिंक पँथर्सचा खेळ तुलनेने अधिक बहरत गेला.
अन्य एका लढतीत बेंगळूर बुल्सने जेतेपदाच्या दिशेने महत्त्वाकांक्षी आगेकूच करताना गुजरात जायंट्सचा 46-37 असा धुव्वा उडवला. सहाव्या आवृत्तीत चॅम्पियनशिप जिंकणाऱया या संघाने मॅटवर उत्तम खेळ साकारला. पवन सेहरावतने 19 गुणांची कमाई करत वरचष्मा गाजवला तर भरतने 9 गुणांसह त्याला उत्तम साथ दिली. गुजरातने अखेरपर्यंत झुंझार खेळ साकारला. पण, निर्णायक क्षणी तीनवेळा ऑलआऊट होणे त्यांच्यासाठी महागडे ठरले. युवा रायडर राकेशने सुपर-10 नोंदवताना 14 गुणांचे योगदान दिले. पुढील लढतीतही तोच या संघाचा अव्वल रायडर ठरु शकेल.
आजचे सामने
हरियाणा स्टीलर्स वि. दबंग दिल्ली (सायं. 7.30 वा.), युपी योद्धा वि. तेलुगू टायटन्स (रात्री 8.30 वा.), यू मुम्बा वि. बंगाल वॉरियर्स (रात्री 9.30 वा.)