नवी दिल्ली
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे पुत्र विवेक यांची शनिवारी माफी मागितली आहे. 2019 च्या मानहानी प्रकरणात रमेश यांनी ही माफी मागितली आहे. विवेक यांनी या प्रकरणाच्या खटल्यातील आरोपींच्या यादीतून जयराम यांचे नाव मागे घेतले आहे. रमेश यांच्यासह एका नियतकालिकाच्या विरोधात विवेक डोवाल यांनी खटला दाखल केला होता. नियतकालिकात प्रकाशित एका लेखात ‘विवेक यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी’ करण्यात आल्या होत्या. डोवाल यांच्या विरोधात आवेशापोटी आरोप केले होते. निवडणुकीच्या वातावरणामुळे असे घडले होते, असे रमेश यांनी माफीनाम्यात नमूद केले आहे.
नियतकालिकाच्या लेखात नमूद अपमानास्पद बाबींचा रमेश यांनी एका पत्रकार परिषदेत उल्लेख केला होता, याचमुळे त्यांच्याविरोधातही याचिका दाखल करण्यात आली होती. नियतकालिक जाणूनबुजून आपली प्रतिमा मलीन करत असून आपली बदनामी करत आहे. अजित डोवाल यांच्याविषयीच्या वैरभावनेतून नियतकालिक हा प्रकार करत असल्याचा आरोप विवेक यांनी केला आहे.