गांधीनगर / प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर कोरोना महामारीसह अनेक नैसर्गिक आपत्तींना सरकारला सामोरे जावे लागले पण लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील या सरकारने महाराष्ट्रात प्रभावीपणे काम केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडले पाहिजे यासाठी विरोधकांनी मागील अडीच वर्षात जी जी कारस्थाने केली त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. राज्यातील एकूण परिस्थिती पाहता कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई जाधव यांचा विजय निश्चित असून त्या मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील असे उद्गार सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काढले.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीनिमित्त राज्यमंत्री यड्रावकर यांनी आज गांधीनगर परिसर, गांधीनगर रोड वरील मसुटे मळा आणि शाहूपुरी परिसरात भेटीगाठी घेतल्या आणि जयश्रीताई जाधव यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी ते बोलत होते, गांधीनगर रोडवरील मसुटे मळा येथे बोलताना राज्यमंत्री यड्रावकर पुढे म्हणाले, चंद्रकांत आण्णा यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली आहे. निवडणूक प्रचारार्थ होणाऱ्या सभांमधून विरोधकांकडील जबाबदार मंडळीकडून जी वक्तव्ये केली जात आहेत ती अतिशय निषेधार्ह आहेत. कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरच्या जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येण्यात अडचण नाही असेही शेवटी राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले. मसुटे मळा भेटीनंतर शाहूपुरीतील व्यापारी पेठ परिसरातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या व महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई जाधव यांना विजयी करण्याबाबत मार्गदर्शन केले, मसुटे मळा येथील बैठकीत बाबासाहेब मसुटे, गुणपाल मसूटे, राजू मसुटे, उदय मसुटे, किरण मसुटे, नजीर सरमूर, माजी नगरसेवक नंदू डकरे तर शाहूपुरी येथील बैठकीदरम्यान माजी नगरसेवक दिलीप शेटे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, हिरा भवन ट्रस्ट चे अध्यक्ष शहा, राजेंद्रभाई शहा, दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष प्रफुल्ल चमकले, राहुल चव्हाण, माजी नगरसेवक सुरेश रोटे, दिगंबर जैन बोर्डिंगचे अध्यक्ष धनंजय दुग्गे, केतन शहा, गिरीश साटम त्याचबरोबर राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासोबत जयसिंगपूर जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील मजलेकर, संजय नांदणे आदी मान्यवर उपस्थित होते.