प्रतिनिधी/जयसिंगपूर
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी सिटीझन फोरम यांच्यावतीने सॅनिटायझर चेंबरची उभारणी करण्यात आली. हा प्रयोग शिरोळ तालुक्यात प्रथमच सुरु करण्यात आला असून शास्त्रोक्त दृष्ट्या परिपूर्ण अशा स्वरूपाच्या उपक्रमामुळे शहरवासियांना याचा चांगला लाभ मिळणार आहे.
सिटीझन फोरमचे सदस्य रणजीत महाडिक यांनी या उपक्रमाविषयी माहिती देताना सॅनिटायझर चेंबरची उभारणी करण्यासाठी अनेक मान्यवरांचे, संस्थांचे सहकार्य लाभल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. मंत्री यड्रावकर यांनी सिटीझन फोरम यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक व अभिनंदन केले.
यावेळी बोलताना मंत्री यड्रावकर म्हणाले, आपल्या शहरात सर्व नागरिकांना व तपासणीसाठी येणार्या प्रत्येक रुग्णांना या चेंबरचा नक्कीच उपयोग होईल. आपल्या शहरांमधील प्राथमिक आरोग्य केंद्र अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहे. आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, कर्मचारी, येणारे रुग्ण यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा चेंबर अतिशय महत्वाचा असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी मंत्री यड्रावकर यांनी जयसिंगपूर आरोग्य केंद्राची पाहणी करत उपस्थितीत डॉक्टर्स व कर्मचार्यांना आवश्यक त्या सुचना दिल्या.
कोल्हापूर जिल्ह्यात सर्व प्रथम आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या संकल्पनेतून सॅनिटायझर चेंबरची जिल्ह्यात चार ठिकाणी सुरुवात करण्यात आली. या चेंबरच्या उद्घाटन प्रसंगी
नगराध्यक्षा डॉ. निता माने, उद्योगपती विनोद घोडावत, उद्योजक राजेश सानिकोप, कनक शहा, विलास रजपूत, पी.एम. गाणबावले, दशरथ शेटे, दिलीप पाटील-कोथळीकर, निखिल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.