प्रतिनिधी / जयसिंगपूर
मटण दरवाढी संदर्भात जयसिंगपूर पालिकेत व्यापारी आणि मटण दरवाढ कृती समितीची बैठक झाली. मात्र दराबाबतची चर्चा न होता चांगल्या प्रतीचे मटण विक्री होत नसल्याची तक्रार झाली. पालिकेचे कर्मचारी आणि कृती समितीच्या प्रतिनिधींनी मटण मार्केटची पहाणी केली. त्यावेळी दुकानात मृत कोंबडय़ा, मेंढया, शेळया यांचे शिळे मटण विक्रीस ठेवल्याचे लक्षात आल्याने कृती समितीच्या पदाधिकाऱयांनी जनतेच्या जिवाशी खेळत असलेल्या व्यापाऱयांचा निषेध केला. मटण खवय्यांनी जयसिंगपूरात मटणाची खरेदी करू नये अशा सुचना दिल्या आहेत. पालिकेने तातडीने या प्रश्नी लक्ष घालून कारवाही करावी अशी मागणी केली.
या बैठकीस कोल्हापूरचे दिलीप देसाई, बाबा पारडे, ऍड. इंदुलकर आदी मटण दरवाढ कृती समितीचे पदाधिकारी जयसिंगपूरमध्ये आले असता शहरातील पदाधिकाऱयांनीही पालिकेत येवून मटण विक्रेत्यांना बोलवून घेण्याचे आवाहन केले. मटण विक्रेत्यांनी आम्ही चांगल्या प्रकारचे मटण विकत असल्यामुळेच दर जास्त घ्यावा लागतो असा कांगावा केला. तरीही पदाधिकाऱयांनी मटणमार्केटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्यासमोर विदारक चित्र उभे राहिले. मेलेल्या कोंबडय़ांचा ढिग आढळून आला. शीतगृहामध्ये शिळे मटण मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होते. शेळ्यामेंढय़ांची कातडी इतस्ततः पडलेली आढळून आली. खवय्यांच्या जिवनाशी व्यापारी खेळ करत असल्याचे निदर्शनास आल्याने वातावरण तापले.
दरम्यान मटण मार्केटमध्ये सर्वत्र अवस्वच्छता पसरली आहे. दुकानदारांनी मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे झालेल्या प्रचंड प्रमाणातील गर्दीमुळे रस्ता लहान झाला आहे. खरेदीसाठी येणाऱया स्त्रिया असुरक्षित बनल्या आहेत. पालिकेने त्याबाबत तातडीने लक्ष घालावे आणि उचीत निर्णय घ्यावा अशी मागणीही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. या आंदोलनात शंकर नाळे, चंद्रकांत जाधव-घुणकीकर, बजरंग खामकर, सुरेश शिंगाडे, अनिल कलकुटगी यांच्यासह मटण दरवाढ कृती समितीचे सदस्य मोठय़ा संख्येने सहभागी झाले.