शिरोळ / प्रतिनिधी
केबल, कॉपर वायर चोरीप्रकरणी तीन संशयीत चोरट्यांना शिरोळ पोलिसांनी अटक केली आहे. या चोरी प्रकरणात जयसिंगपुरातील तिघांचा समावेश आहे. दरम्यान त्यांना न्यायालयात हजर केले असता 14 दिवस न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, शिरोळ पोलिसांचे पथक गस्त घालत असताना नांदणी नाका परिसरात चोरलेली केबल पेटवून त्यातील तांब्याची तार काढत असल्याचे पोलिसांना दिसून आले. संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी केबल चोरी केल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये प्रशांत नंदकुमार हातळगे (वय 38, रा. गल्ली नं. 12, जयसिंगपूर, असीफ दादासाहेब पिरजादे (वय 29, रा. गल्ली नं. 9, जयसिंगपूर) व उदय महादेव भोसले (वय 44 रा. गल्ली नं. 13 जयसिंगपूर) हे संशयित चोरटे शिरोळ पोलिसांना मिळून आले. यामध्ये 25 ते 30 किलो कॉपर अॅल्युमिनिअमच्या वायर, केबल वायरींगची वाहतूक करणारी अॅपे रिक्षा असा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पीएसआय कुरणे फौजदार धुमाळ हेडकॉन्स्टेबल ताहीर मुल्ला गजानन कोष्टी यांनी केली.