जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात
प्रतिनिधी /सातारा
कोरेगावातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कालच म्हणजे बुधवारी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली आहे. सीआरपीएफच्या जवानांची मदत घेऊन ही कारवाई सुरू आहे. अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाकडून कारवाई केली जात आहे. फक्त जरंडेश्वरच नाही तर दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरु आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या आयकर छाप्याबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नाही.
भाजपा नेते किरीट सोमय्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर बुधवारी सकाळी दाखल झाले होते. यावेळी सभासदांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी किरीट सोमय्या यांनी यावेळी शेतकऱयांना पूर्णपणे न्याय दिला जाईल. कोणत्याही परिस्थितीत कारखाना बंद पडणार नाही. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारखान्याच्या व्यवहाराची पूर्ण चौकशी होईल असं सांगितलं होतं.
कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर कारखान्यावर दाखल बऱयाच सभासदांनी कारखाना सभासदांच्या ताब्यात यावा, अशी प्रमुख मागणी किरीट सोमय्या यांच्याकडे केली. कारखाना चांगला सुरु होता. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्रही मोठे होते. मात्र त्यावेळी कारखाना कवडीमोल भावाने कारखान्याचा व्यवहार केला. हा कारखाना सामान्य माणसांचा आहे. राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यातील रकमेतून हा कारखाना अजित पवार यांनी बेनामी पद्धतीने आपल्या ताब्यात घेतला होता. त्या विरोधात ईडीने कारवाई केली होती. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कंपनीने कमी दरात खरेदी के लेल्या सहकारी साखर कारखान्याची चौकशी करावी, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली होती.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व शेतकरी सभासदांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावर किरीट सोमय्या आल्यानंतर घेराव घातला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व काही शेतकऱयांनी कारखाना परिसरात घेतलेल्या भूमिकेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर गुरुवारी दुसऱयाच दिवशी जंरडेश्वर कारखान्यावर आयकर विभागाने छापा टाकल्याने कोरेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. भाजपकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांचे खच्चीकरण करण्यासाठी खोटे आरोप करुन कारवाई करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱयांचे म्हणणे आहे.
ईडीकडून करण्यात आली होती जप्तीची कारवाई महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने अजित पवारांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या ‘जरंडेश्वर शुगर्स’ या कारखान्यावर अंमलबजावणी संचालनालयाने जप्तीची कारवाई केली होती. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या घोटाळाप्रकरणी सातारा जिह्यातील जरंडेश्वर शुगर्स या कारखान्याच्या 66 कोटींची जागा, इमारत आणि यंत्रसामग्री यावर जप्ती आणण्यात आल्याची माहिती ईडीच्या सूत्राकडून देण्यात आली होती. जरंडेश्वर सहकारी कारखाना 2010 मध्ये लिलावात काढण्यात आला होता. तेव्हा समर्पित किमतीपेक्षा कमी दराने हा कारखान्याचा लिलाव करण्यात आल्याचे ईडीला चौकशीत आढळले होते. यानुसारच ही कारवाई करण्यात आली होती.