बर्लिन
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे जर्मनी सध्या व्यथित झाला असून या देशाने जनतेला चौथा बुस्टर डोस देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटशी लढणारी नवी लस येत असल्याचेही जर्मनी सरकारने स्पष्ट केले आहे. या देशापाठोपाठ ब्रिटनही चौथा डोस देण्यासाठी सज्ज झाला असल्याची माहिती आहे. जर्मनीचे आरोग्य मंत्री कार्ल लॉटरबॅच यांनी ओमिक्रोनशी लढण्यासाठी चौथा डोस घेणे अत्यावश्यक असल्याचे डेली मेलला दिलेल्या माहितीमध्ये स्पष्ट केले आहे. बायोनटेक या कंपनीला जर्मनी सरकारने नव्या लसींच्या निर्मितीसाठी ऑर्डर दिली असल्याचे सांगितले जात आहे. नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटशी लढणारी नवी लस तयार होण्यासाठी साधारण एप्रिल ते मेपर्यंतचा कालावधी लागू शकतो, असेही जर्मनी सरकारने म्हटले आहे. यासोबतच देशाने चाळीस लाख नव्या नोवावॅक्स लसीची आणि एक कोटी दहा लाख नव्या व्हॅलनेव्हा लसीची ऑर्डर बायोनटेकला दिली असल्याचे सांगितले जात आहे. सध्याला देशातील लोकांना चौथ्या बूस्टर डोससाठी मॉडर्ना लसीचा वापर केला जात आहे. जानेवारीच्या मध्यानंतर या व्हेरीयंटच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्मयता तज्ञांनी व्यक्त केली आहे.