वृत्तसंस्था/ डर्मस्टॅड
जर्मनीचा पुरूष भालाफेकपटू तसेच ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता थॉमस रोहलर याला दुखापतीमुळे टोकियो ऑलिंपिकपासून वंचित व्हावे लागत आहे. पाठीच्या दुखापतीमुळे रोहलर आता जुलै महिन्यात होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होवू शकणार नाही.
भालाफेकीचा सराव करत असताना रोहलरला पाठीचा स्नायू दुखावला. या दुखापतीमुळे त्याला सातत्याने वेदना होत आहेत. या दुखापतीमुळे रोहलरला पुरूषांच्या भालाफेकीत टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक राखता येणार नाही. 2018 च्या युरोपियन ऍथलेटिक्स स्पर्धेत रोहलर विजेता ठरला होता. 2016 साली झालेल्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत रोहलरने पुरूषांच्या भालाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळविताना 90.3 मी. भालाफेक केली होती.