वृत्तसंस्था/ सिनसिनॅटी
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या सिनसिनॅटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या ऍलेक्झांडर व्हेरेव्हने ग्रीकच्या तृतीय मानांकित सित्सिपसचा पराभव करत एकेरीची अंतिम फेरी गाठली. आता व्हेरेव्ह आणि रशियाचा रूबलेव्ह यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
शनिवारी खेळविण्यात आलेल्या पुरूष एकेरीच्या उपांत्य सामन्यात व्हेरेव्हने सित्सिपसचा 6-4, 3-6, 7-6 (7-4) असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. हा उपांत्य फेरीचा सामना चुरशीचा झाला. दुसऱया उपांत्य सामन्यात रशियाच्या सातव्या मानांकित आंद्रे रूबलेव्हने आपल्याच देशाच्या द्वितीय मानांकित डॅनील मेदव्हेदेवला 2-6, 6-3, 6-3 असा पराभवाचा धक्का देत अंतिम फेरी गाठली.
महिलांच्या विभागात ऑस्ट्रेलियाच्या टॉप सीडेड बार्टीने एकेरीची अंतिम फेरी गाठताना उपांत्य सामन्यात जर्मनीच्या अँजेलीक केर्बरचा 6-2, 7-5 असा पराभव केला. महिला एकेरीच्या दुसऱया उपांत्य सामन्यात स्वीसच्या टिचमनने झेकच्या पाचव्या मानांकित प्लिसकोव्हाला 6-2, 6-4 असे पराभूत करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. बार्टी आणि टिचमन यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.