वृत्तसंस्था/ कोलॉन
एटीपी टूरवरील रविवारी येथे झालेल्या कोलॉन पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या टॉप सीडेड ऍलेक्झांडर व्हेरेव्हने एकेरीचे जेतेपद पटकाविले. गेल्या आठवडाभराच्या कालावधीत व्हेरेव्हचे एटीपी टूरवरील इनडोअर स्पर्धेतील हे सलग दुसरे जेतेपद आहे.
रविवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात व्हेरेव्हने अर्जेंटिनाच्या दियागो शुवार्त्झमनचा 6-2, 6-1 अशा सरळ सेटमध्ये 70 मिनिटांच्या कालावधीत पराभव केला. उभय टेनिसपटूमध्ये यापूर्वी झालेल्या तीन लढतीमध्ये दोनवेळा व्हेरेव्हला हार पत्करावी लागली होती. पुढील महिन्यात लंडनमध्ये होणाऱया एटीपी टूर अंतिम स्पर्धेसाठी व्हेरेव्ह आता सज्ज झाला आहे. 2018 साली व्हेरेव्हने पहिल्यांदा एटीपी अंतिम स्पर्धेतील जेतेपद मिळविले होते.