वृत्तसंस्था/ बर्लिन
23 जुलैपासून सुरु होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱया जर्मनीच्या पुरुष फुटबॉल संघामध्ये अनुभवी आणि वयस्कर स्ट्रायकर मॅक्स प्रुसचा समावेश करून अनपेक्षित धक्का दिला आहे.
या स्पर्धेसाठी जर्मनीचा फुटबॉल संघ जाहीर करण्यात आला आहे. 33 वर्षीय मॅक्स क्रूसला तब्बल पाच वर्षानंतर पुन्हा राष्ट्रीय संघामध्ये संधी देण्यात आली आहे. जर्मनीच्या फुटबॉल संघामध्ये आता तीन वयस्कर फुटबॉलपटूंचा समावेश आहे. 24 वर्षीय नदीम अमिरी, 27 वर्षीय मॅक्समिलेन अर्नोल्ड यांनाही संधी मिळाली आहे. जर्मनीतील लिग स्पर्धेत अमिरी हा बायर लिव्हरकुसेन तर अर्नोल्ड वूल्फ्सबर्ग क्लबचे प्रतिनिधित्व करतो. 2017 साली 21 वर्षाखालील वयोगटाची युरोपीयन फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱया जर्मनी संघामध्ये अर्नोल्डचा समावेश होता. टोकियो ऑलिंपिकसाठी जर्मनीच्या फुटबॉल संघाला स्टीफन कुंझ यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत जर्मनीचा सलामीचा सामना बलाढय़ ब्राझीलबरोबर 22 जुलै रोजी होणार आहे. 2016 च्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत जर्मनी आणि ब्राझिल यांच्यातच अंतिम लढत झाली होती. गेल्या महिन्यात 21 वर्षाखालील वयोगटातील कनिष्ठांची युरोपीयन फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱया जर्मनी संघातील 7 खेळाडूंची ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत पुरुषांच्या फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना शनिवारी 7 ऑगस्टला होणार आहे.