वृत्तसंस्था/ पुणे
भारताचा नवोदित टेनिसपटू 22 वर्षीय सुमीत नागल याला जर्मनीतील वास्तव्य फायदेशीर ठरले. सुमीत नागल हा गेल्या अडीच महिन्याच्या कालावधीत जर्मनीतच राहिला होता. कोरोना महामारी संकटामुळे तो भारतात येवू शकला नाही पण जर्मनीतील वास्तव्य त्याला टेनिसच्या दृष्टीकोनातून अधिकच उपयुक्त ठरले.
जर्मनीतील पेनी येथे नेन्सी टेनिस अकादमीमध्ये सुमीत नागल सुमारे अडीच महिने टेनिसचा सराव करीत होता. या सरावानंतर त्याने येथे झालेल्या क्लबस्तरीय टेनिस स्पर्धा गेल्या रविवारी जिंकली. कोरोनामुळे मला जर्मनीतच राहावे लागले आणि टेनिसचा सराव करण्याची संधी मला उपलब्ध झाली. क्लबस्तरीय टेनिस स्पर्धेत सुमीत नागलने अंतिम सामन्यात जर्मनीच्या डॅनियल मेसूरचा 6-1, 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. व्यावसायिक ऍथलीटस् नशिबावर विश्वास ठेवत नाहीत तर ते स्वत:चे नशीब घडविण्यावर विश्वास ठेवतात याचे प्रत्यय सुमीत नागलच्या बाबतीत आल्याचे दिसून आले.