वृत्तसंस्था / मुलही ऍन डेर रुहर, जर्मनी
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळविलेल्या भारताच्या लक्ष्य सेनला येथे झालेल्या जर्मन ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत त्याला थायलंडच्या कुनलावत वितिदसमकडून हार पत्करावी लागली.
लक्ष्य सेनने या स्पर्धेत प्रारंभापासून शानदार प्रदर्शन करीत अंतिम फेरीत धडक मारताना ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर ऍक्सेलसेनला पराभवाचा धक्का दिला होता. पण या कामगिरीची पुनरावृत्ती त्याला अंतिम फेरीत करता आली नाही. 20 वर्षीय सेनला कुनलावतकडून 18-21, 15-21 असा 57 मिनिटांच्या संघर्षपूर्ण खेळात पराभव पत्करावा लागला. कुनलावत हा तीनवेळचा ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन आहे. जागतिक क्रमवारीत 12 व्या स्थानावर असणारा सेन व 20 वा मानांकित कुनलावत यांच्यात याआधी सहा लढती झाल्या होत्या आणि त्यात प्रत्येकाने तीन तीन लढती जिंकल्या होत्या. या लढतीत 4-4 पर्यंत दोघानीही तोडीस तोड खेळ केला. यानंतर मात्र कुनलावतने वैविध्य व फसवे फटके यांच्या बळावर मुसंडी मारत ब्रेकपर्यंत 11-6 अशी आघाडी मिळविली. सेनने वेगावर लक्ष केंद्रित केले आणि नेटजवळ शानदार खेळ करीत 15-16 अशी त्याची आघाडी कमी केली. पण चपळ कुनलावतने ओव्हरहेड क्रॉसकोर्ट ड्रॉप शॉटवर दोन गेमपॉईंट्स मिळविले आणि नंतर क्रॉस कोर्ट स्मॅशवर पहिला गेम संपवला.
उपांत्य फेरीत ऍक्सेलसेनविरुद्ध सेनला खूप संघर्ष करावा लागला होता. त्याचे परिणाम यावेळी झाल्याचे दिसून आले. कुनलावतने दुसऱया गेममध्ये झटपट 7-3 अशी बढत घेतली आणि ब्रेकपर्यंत 11-5 अशी ती वाढविली. ब्रेकनंतर सेनने झुंजार खेळ करीत सलग चार गुण मिळविले, पण कुनलावतने 19-15 अशी आघाडी घेण्यात यश मिळविले. हा गेम जिंकण्यासाठी कुनलावतला पाच गेमपॉईंट्स संघर्ष करावा लागला.
सेनने यापूर्वी डच व सारलॉलक्स ओपन या दोन सुपर 100 स्पर्धा जिंकल्या आहेत. याशिवाय 2019 मध्ये त्याने बेल्जियम, स्कॉटलंड, बांगलादेशमध्ये तीन आंतरराष्ट्रीय चॅलेंज स्पर्धांही जिंकल्या आहेत. कोव्हिडमुळे त्याच्या या घोडदौडीला बेक लागला होता. गेल्या वर्षी तो हायलो ओपनमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती आणि वर्ल्ड टूर फायनल्समध्ये बाद फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्यपदक पटकावण्याचा पराक्रम केला होता.