कोरोना विषाणूच्या संकटाला तोंड देणाऱया जर्मनीत हजारोंच्या संख्येत लोकांनी रस्त्यांवर धाव घेत निर्बंधांना विरोध दर्शविला आहे. या निदर्शकांनी जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या टाळेबंदीच्या निर्णयाला प्रखर विरोध केला आहे. पोलिसांनी पाण्याचा मारा करत निदर्शकांना पांगविण्याचा प्रयत्न केला, परंतु एका निदर्शकाने सोव्हियत संघाच्या काळातील टी300 रणगाडय़ावर चढून टाळेबंदीच्या विरोधात घोषणा दिल्या आहेत.
निषेधाच्या घोषणा
जर्मन पोलिसांनी वारंवार इशारा देऊनही जमावातील कुणीच मास्क परिधान केलेला नव्हता. पाण्याचा मारा होताच निदर्शकांनी ‘शेम, शेम’च्या घोषणा दिल्या. निदर्शकांनी तेथून हटण्यासही नकार दिल्याने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ब्रांडनेबर्ग गेटवर निदर्शने
याचदरम्यान पोलिसांचे हेलिकॉप्टर निदर्शनस्थळी पोहोचल्याने निदर्शकांनी फटाके फोडून आग लावली आहे. निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर जर्मनीच्या सरकारने संसदेबाहेर निदर्शने करण्यास बंदी घातली आहे. तरीही सुमारे 5 हजार निदर्शकांनी बर्लिनच्या ब्रांडेनबर्ग गेट येथे पोहोचून सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. सरकार टाळेबंदी लागू करून ‘हुकुमशाही’ लागू करू पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.