वृत्तसंस्था/ लंडन
2022 साली होणाऱया फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी सध्या विविध ठिकाणी सुरू असलेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेत माजी विजेत्या जर्मनी, इंग्लंड आणि इटली या संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदविले. तर ग्रीसने बलाढय़ स्पेनला 1-1 असे बरोबरीत रोखले.
पात्र फेरीच्या ‘जे’ गटातील गुरुवारी झालेल्या सामन्यात माजी विश्वचषक विजेत्या जर्मनीने आईसलँडवर 3-0 असा एकतर्फी विजय मिळविला. डय़ुसबर्ग येथे झालेल्या या सामन्यात जर्मनीतर्फे गोर्टेझेका, हॅवर्ज आणि गुंडोगेन यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. विम्बले येथे झालेल्या पात्र फेरीच्या अन्य एका सामन्यात इंग्लंडने सॅन मारिनोचा 5-0 असा पराभव केला. या सामन्यात इंग्लंडतर्फे डॉम्निक लेविनने 2 गोल नोंदविले. वेटकिन्स तसेच रहिम स्टर्लिंग आणि लेविन यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
परमा येथे झालेल्या क गटातील सामन्यात इटलीने नॉर्दर्न आयर्लंडचा 2-0 असा पराभव केला. इटलीतर्फे बेरार्दी आणि इमोबिले यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. इटलीतर्फे हे दोन्ही गोल पहिल्या 39 मिनिटांच्या कालावधीत नोंदविले गेले. ग्रेनेडा येथे झालेल्या अटीतटीच्या सामन्यात बलाढय़ स्पेनला ग्रीसने 1-1 असे बरोबरीत रोखले. 32 व्या मिनिटाला मोराटाने ग्रीसचे खाते उघडले. पण 60 व्या मिनिटाला बदली खेळाडू मार्टिनेझने स्पेनला बरोबरी साधून दिली. पोलंड आणि हंगेरी यांच्यातील बुडापेस्ट येथे झालेला सामना 3-3 असा बरोबरीत राहिला. डेन्मार्कने इस्त्रायलवर 2-0 अशी मात केली. ‘फ’ गटातील सामन्यात स्कॉटलंडने ऑस्ट्रियाला 2-2 असे गोल बरोबरीत रोखले.