जगभरात कोरोना विषाणू संसर्गाचे 2,48,567 बळी : एकूण रुग्णांची संख्या 35,82,889 वर
जगभरात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 2 लाख 48 हजार 567 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 35 लाख 82 हजार 889 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. तसेच 11 लाख 60 हजार 131 जणांना कोरोना संसर्गापासून मुक्तता मिळाली आहे. सर्वाधिक ग्रस्त अमेरिकेत रुग्णसंख्या 11 लाख 88 हजार 826 वर पोहोचली आहे. तेथे 68 हजार 606 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर न्युझीलंडमध्ये 7 आठवडय़ांमध्ये पहिल्यांदाच 24 तासांमध्ये संसर्गाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तर जर्मनीत 25 मार्चनंतर सर्वात कमी म्हणजेच 43 जणांचा मृत्यू झाला आहे. जर्मनीत आतापर्यंत 6,692 जणांचा बळी गेला आहे.
मांसप्रक्रिया केंद्र कारणीभूत
ऑस्ट्रेलियात कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्यामागे व्हिक्टोरिया प्रांतातील मांस प्रक्रिया प्रकल्प कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. ऑस्ट्रेलियात 22 नवे रुग्ण सापडले असून यातील 19 बाधित प्रकल्पाचे कर्मचारी आहेत. यापूर्वी याच प्रकल्पातून 15 रुग्ण सापडले होते. व्हिक्टोरिय प्रांतात 13 हजार जणांची चाचणी करण्यात आली आहे.
अमेरिकेत 1,450 बळी
अमेरिकेत 24 तासांमध्ये 1,450 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशातील एकूण बळींची संख्या आता 68,606 वर पोहोचली आहे. 11 लाख 88 हजार 826 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत लस विकसित करू असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला केला आहे.
जर्मनीत 679 नवे रुग्ण
जर्मनीत मागील 24 तासांत 679 नवे रुग्ण सापडले असून हा आकडा 12 मार्चनंतरचा सर्वात कमी ठरला आहे. तर रविवार-सोमवारदरम्यान 43 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा 25 मार्चनंतरचा सर्वात कमी आहे. जर्मनीतील रुग्णांची संख्या आता 1,65,664 झाली आहे. तर 6,866 जणांना कोरोना संसर्गामुळे जीव गमवावा लागला आहे.
न्युझीलंडमध्ये नवा रुग्ण नाही
न्युझीलंडमध्ये आरोग्य महासंचालक डॉ. एशले ब्लूमफील्ड यांच्यानुसार दिवसभरात एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. 25 मार्चपासून पहिल्यांदाच एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. देशात आतापर्यंत 1,487 रुग्ण सापडले असून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1,276 जणांना कोरोनापासून मुक्तता मिळाली आहे. 4 लाख लोक कामावर जात असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली आहे.
द. कोरियात 8 नवे बाधित
दक्षिण कोरियात रविवारी देशाबाहेरून आलेल्या 8 नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सेंट्रल फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार स्थानिक लोकसंख्येमध्ये एकही रुग्ण सापडलेला नाही. याचाच अर्थ देशात महामारी नियंत्रणात आहे. दक्षिण कोरियात आतापर्यंत 10 हजार 801 रुग्ण सापडले असून 252 जणांचा मृत्यू झाला आहे. तर रविवारपर्यंत 10 हजार जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे.
ब्राझीलमध्ये संकट वाढतेच
ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 1,01,826 वर पोहोचला आहे. तर मृतांची संख्या 7,051 झाली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार देशात दिवसभरात 4,588 नवे रुग्ण सापडले असून 275 जणांचा मृत्यू झाला आहे. रियो डी जेनेरियोमध्ये शेकडो लोकांनी मोर्चा काढत जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजनांवर टीका केली आहे.
जपानमध्ये आणीबाणी वाढली
जपानमध्ये दिवसभरात 200 नवे रुग्ण सापडले आहेत. देशात 15 हजार 769 रुग्ण सापडले असून 523 जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान शिंजो आबे यांनी आणीबाणीचा कालावधी मे अखेरपर्यंत वाढविला आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी घट झालेली नाही, रुग्णालयांवरील ताण अद्याप कायम असल्याचे आबे यांनी म्हटले आहे.
चीनमध्ये 3 नवे बाधित
चीनमध्ये महामारीचे 3 नवे बाधित सापडले आहेत. परंतु हे नवे रुग्ण देशाबाहेरून आलेले लोक आहेत. चीनमधील कोरोनाबाधितांची संख्या 82 हजार 880 झाली असून 4,633 जणांचा मृत्यू झाला आहे. मेच्या तीन दिवसांच्या सुटीदरम्यान 8.5 कोटी देशांतर्गत पर्यटक घरातून बाहेर पडल्याने आर्थिक हालचालींना वेग आला आहे.
पाकिस्तानात रुग्ण वाढले
पाकिस्तानात टाळेबंदी लागू असूनही सलग 6 व्या आठवडय़ात रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तेथील रुग्णसंख्या आता 20 हजारांच्या पलिकडे पोहोचला असून 457 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयानुसार पूर्व पंजाब प्रांतात 7,497 रुग्ण आढळले आहेत. दक्षिण सिंध प्रांतात 7,465, खैबर पख्तूनख्वामध्ये 3,129, बलुचिस्तानात 1,172 आणि इस्लामाबादमध्ये 393 रुग्ण सापडले आहेत.
इस्रायलमध्ये संसर्ग घटतोय
इस्रायलमध्ये दिवसभरात 15 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील एकूण रुग्णांची संख्या 16 हजार 208 झाली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार रविवारी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 232 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.