वारणानगर / प्रतिनिधी
गुवाहाटी, आसाम येथे ३ री खेलो इंडिया स्पर्धा २०२० मार्फत संपन्न झालेल्या देशपातळीवर जलतरण स्पर्धेत वारणानगर ता. पन्हाळा येथील कु. अनुष्का सयाजी पाटील हिने १४ वर्ष वयोगटात २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये द्वितीय क्रमांक पटकावत यश संपादित केल्याबद्दल श्री वारणा शिक्षक मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. आ. विनय कोरे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
आमदार डॉ. विनय कोरे यांनी आज बालिका दिनाचे औचित्य साधुन वारणानगर (बाबू पार्क) येथील घरी जलतरणपटु अनुष्का सयाजी पाटील हिला भेटून अभिनंदन व सत्कार केला. अनुष्काने देशपातळीवर व राज्य स्तरावरील देखील दिमाखदार कामगिरी उंचावून शाळेचे व तालुक्याचे नाव उज्वल करावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी वारणा दूध संघाचे संचालक एच. आर. जाधव, प्रा. डॉ. बी. टी. साळोखे (सर), जयवंत पाटील (सावर्डेकर), बहिरेवाडीचे सरपंच शिरीषकुमार जाधव, कुमार कणसे, बी. टी. पायमल, प्रदिप चव्हाण, वारणा बझारचे जनरल मॅनेजर शरद महाजन, उपस्थित होते. सर्वांचे स्वागत व आभार सयाजी पाटील यांनी मानले.