वृत्तसंस्था/ गुवाहाटी
खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राने जलतरणातील पदकांची लयलूट कायम राखताना तीन सुवर्ण, दोन रौप्य व एका ब्राँझपदकाची भर घातली.
केनिशा गुप्ताने मुलींच्या 17 वर्षाखालील गटात 200 मीटर्स वैयक्तिक मिडले रिले शर्यत 2 मिनिटे 25.80 सेकंदांत जिंकली. तिचीच सहकारी अपेक्षा फर्नांडिसने रौप्यपदक पटकाविले. तिने हे अंतर 2 मिनिटे 29.25 सेकंदांत पार केले. याच वयोगटात केनिशा व अपेक्षा यांनी करिना शांता व पलक धामी यांच्या साथीत 4 बाय 100 मीटर्स मिडले रिले शर्यतीचेही सुवर्णपदक पटकाविले. त्यांनी हे अंतर 4 मिनिटे 29.59 सेकंदांत पूर्ण केले. मुलींच्या 21 वर्षाखालील गटात महाराष्ट्राला या शर्यतीत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
मुलांच्या 17 वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या वेदांत बापना याने 200 मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत सोनेरी कामगिरी केली. त्याने ही शर्यत 2 मिनिटे 10.85 सेकंदांत पार केली. याच वयोगटात सुश्रुत कापसे याने 800 मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत रौप्यपदक पटकाविले. त्याला हे अंतर पार करण्यास 8 मिनिटे 52.74 सेकंद वेळ लागला.
वेटलिफ्टींगमध्ये रितेशला रौप्यपदक
महाराष्ट्राच्या रितेश म्हैसाळ याने युवा गटाच्या 89 किलो विभागात रौप्यपदक मिळविले. त्याने स्नॅचमध्ये 112 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 136 किलो असे एकूण 248 किलो वजन उचलले. त्याचाच सहकारी सानिध्य मोरे याला याच विभागात ब्राँझपदक मिळाले. त्याने अनुक्रमे 109 व 134 किलो असे एकूण 243 किलो वजन उचलले.
मुलींच्या युवा 76 किलो गटात महाराष्ट्राच्या श्रेया गणमुखी हिने रौप्यपदक मिळविले. तिने स्नॅचमध्ये 73 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 89 असे एकूण 162 किलो वजन उचलले. कनि÷ मुलींच्या 76 किलो गटात महाराष्ट्राच्या करुणा गढे हिला ब्राँझपदक मिळाले. तिने स्नॅचमध्ये 64 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 86 असे एकूण 150 किलो वजन उचलले.