पहिल्या कसोटीत भारत 113 धावांनी विजयी, बुमराह-शमी-सिराज डावात 8 बळींसह विजयाचे मुख्य शिल्पकार, भारताची मालिकेत 1-0 फरकाने आघाडी, केएल राहुल सामनावीर
वृत्तसंस्था /सेंच्युरियन
‘वन्स इन अ जनरेशन’ म्हणून ओळखल्या जाणाऱया बुमराह-शमी व सिराज यांच्या तिखट व तेजतर्रार माऱयाने दक्षिण आफ्रिकन डावाला मोठे खिंडार पाडल्यानंतर भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी 113 धावांनी धुव्वा उडवला आणि 3 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. विजयासाठी 305 धावांचे आव्हान असताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 68 षटकात अवघ्या 191 धावांमध्येच खुर्दा झाला. पहिल्या डावात शानदार शतक झळकावणाऱया केएल राहुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
गुरुवारी या सामन्याच्या शेवटच्या दिवशी 4 बाद 94 धावांवरुन डावाला पुढे सुरुवात करणाऱया यजमान दक्षिण आफ्रिकेला आणखी 211 धावांची आवश्यकता होती आणि त्यांची मुख्य भिस्त एल्गार, डी कॉक व तेम्बा बवूमा यांच्यावरच होती.
कर्णधार एल्गारने नेतृत्वाला साजेशी खेळी साकारताना 156 चेंडूत सर्वाधिक 77 धावांची खेळी साकारली. मात्र, यानंतरही तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. डी कॉक आता पालकत्वाच्या रजेवर जाणार असल्याने दुसऱया कसोटी सामन्यात उपलब्ध असणार नाही आणि यामुळे मालिकाविजयाचा भारताचा मार्ग आणखी सहजसोपा झाल्यास यात आश्चर्य नसेल.
भारतीय संघातर्फे 4 जलद-मध्यमगती गोलंदाजांनी एकत्रित 18 बळी घेतले तर अश्विनने शेवटचे 2 बळी टिपत संघाच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. पहिल्या डावात शतक झळकावणारा उपकर्णधार केएल राहुल, सामन्यात 8 बळी (5/44 व 3/63) घेणारा मोहम्मद शमी व तिखट मारा साकारणारा बुमराह या विजयात सिंहाचा वाटा उचलण्यात यशस्वी ठरले.
बुमराहने (3-50) दिवसाच्या पहिल्या टप्प्यात एल्गारची संयमी खेळी संपुष्टात आणली तर सिराज (2-47) व शमी देखील यशस्वी ठरले. दुपारच्या सत्रानंतर किंचीत पावसाची शक्यता असल्याने शक्य तितक्या लवकर आफ्रिकन फलंदाजीला खिंडार पाडण्याचा भारताचा गेमप्लॅन येथे विशेष यशस्वी ठरला.
पहिल्या 45 मिनिटांच्या खेळात बवूमा व एल्गार यांनी 36 धावांची भागीदारी साकारत विजयाच्या दिशेने हळुहळू मार्गोत्क्रमण करण्यावर भर दिला होता. शमीने एल्गारचा स्वतःच्या गोलंदाजीवर परतीचा झेल सोडला. पण, बुमराहने अखेर एल्गारला पायचीत करत ही जोडी फोडली. क्विन्टॉन डी कॉकने काही उत्तम चौकार फटकावले. मात्र, तो सिराजच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होत तंबूत परतला. उपाहाराअखेर 7 बाद 182 अशी स्थिती असताना दक्षिण आफ्रिकेचा पदार्पणवीर मार्को जान्सनला शमीने पंतकरवी झेलबाद केले. पुढे वियान मल्डर (1) शमीचे आणखी एक सावज ठरला. त्यानंतर अश्विनने रबाडा व एन्गिडी यांना बाद केले आणि येथेच दक्षिण आफ्रिकेचा डाव 191 धावांवर संपुष्टात आला.
पूर्ण एक दिवसाचा खेळ वाया गेला असतानाही भारताला सुयश!
या लढतीच्या दुसऱया दिवशी संततधारेच्या व्यत्ययामुळे अगदी एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. मात्र, यानंतरही उर्वरित 4 दिवसांचा कालावधी देखील भारताला विजय खेचून आणण्यासाठी पुरेसा ठरला. भारताने गुरुवारी चहापानापूर्वीच दणकेबाज विजयावर शिक्कामोर्तब केले.
गब्बामध्ये श्रीगणेशा, सेंच्युरियनवर सांगता!
यंदा 2021 च्या प्रारंभी गब्बा कसोटी सामन्यात भारताने यजमान ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत एकच खळबळ उडवून दिली होती. आता वर्षातील शेवटच्या कसोटीत भारताने सेंच्युरियन पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अपयशाची मालिकाही अखेर खंडित केली. एका अर्थाने वर्षारंभी गब्बा येथे पाया रचलेल्या भारताने वर्षाच्या अखेरीस सेंच्युरियनवर कळस चढवला!
भारताचे दक्षिण आफ्रिकन भूमीतील कसोटी विजय
- वर्ष निकाल ठिकाण
- 2006 भारत 123 धावांनी विजयी जोहान्सबर्ग
- 2010 भारत 87 धावांनी विजयी दरबान
- 2018 भारत 63 धावांनी विजयी जोहान्सबर्ग
- 2021 भारत 113 धावांनी विजयी सेंच्युरियन
धावफलक
भारत पहिला डाव : सर्वबाद 327
दक्षिण आफ्रिका पहिला डाव : सर्वबाद 197.
भारत दुसरा डाव : सर्वबाद 174
द. आफ्रिका दुसरा डाव ः एडन मॅरक्रम त्रि. गो. शमी 1 (7 चेंडू), डीन एल्गार पायचीत गो. बुमराह 77 (156 चेंडूत 12 चौकार), किगन पीटरसन झे. पंत, गो. सिराज 17 (36 चेंडूत 3 चौकार), रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन त्रि. गो. बुमराह 11 (65 चेंडूत 1 चौकार), केशव महाराज त्रि. गो. बुमराह 8 (19 चेंडूत 1 चौकार), तेम्बा बवूमा नाबाद 35 (80 चेंडूत 4 चौकार), क्विन्टॉन डी कॉक त्रि. गो. सिराज 21 (28 चेंडूत 2 चौकार), वियान मल्डर झे. पंत, गो. शमी 1 (3 चेंडू), मार्को जान्सन झे. पंत, गो. शमी 13 (14 चेंडूत 3 चौकार), कॅगिसो रबाडा झे. शमी, गो. अश्विन 0 (4 चेंडू), लुंगी एन्गिडी झे. पुजारा, गो. अश्विन 0 (1 चेंडू). अवांतर 7. एकूण 68 षटकात सर्वबाद 191.
गडी बाद होण्याचा क्रम
1-1 (मॅरक्रम, 1.3), 2-34 (पीटरसन, 14.1), 3-74 (डय़ुसेन, 36.4), 4-94 (केशव महाराज, 40.5), 5-130 (एल्गार, 50.5), 6-161 (डी कॉक, 59.3), 7-164 (मल्डर, 60.2), 8-190 (जान्सन, 66.5), 9-191 (रबाडा, 67.5), 10-191 (एन्गिडी, 67.6).
गोलंदाजी
जसप्रित बुमराह 19-4-50-3, शमी 17-3-63-3, मोहम्मद सिराज 18-5-47-2, शार्दुल ठाकुर 5-0-11-0, रविचंद्रन अश्विन
9-2-18-2.
करणाऱया भारतीय क्रिकेट संघाचे खास अभिनंदन. ब्रिस्बेन, लॉर्ड्स, ओव्हलमधील ऐतिहासिक विजयाची येथेही खऱया अर्थाने पुनरावृत्ती झाली.
-बीसीसीआय सचिव जय शाह
ब्रिस्बेन, ओव्हल, लॉर्ड्स आणि आता सेंच्युरियन! सेंच्युरियनवर विजय संपादन करणारा पहिला आशियाई संघ ठरल्याबद्दल विराट कोहली, राहुल द्रविड व पूर्ण भारतीय पथकाचे मनापासून अभिनंदन.
-माजी प्रशिक्षक रवी शास्त्री
मोहम्मद शमी हा जागतिक स्तरावरील 3 सर्वोत्तम जलद गोलंदाजांपैकी एक असून आपली जबाबदारी कशी चोख पार पाडायची, याची त्याला उत्तम जाण आहे. कठीण परिस्थितीत सातत्यपूर्ण मारा करण्यात त्याची सर कोणालाही येणार नाही.
-भारतीय कर्णधार विराट कोहली
सेंच्युरियनमध्ये पराभव पत्करावा लागला असला तरी मालिकेत अद्याप दोन सामने बाकी आहेत. आताही सर्व समीकरणे परतावून लावण्यात आम्ही यशस्वी ठरु शकतो. जोहान्सबर्गमधील दुसऱया कसोटीत ताज्या दमाने मैदानात उतरत यश खेचून आणण्यासाठी आम्ही निर्धाराने लढणार आहोत.
-दक्षिण आफ्रिकन कर्णधार डीन एल्गार
2021 चे वर्ष भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तमपैकी एक असेल. या वर्षभराच्या कालावधीत भारताने विदेशी भूमीत मिळवलेले यश विशेष लक्षवेधी ठरले. सांघिक खेळामुळेच हा पराक्रम गाजवणे शक्य झाले आहे.
-भारतीय सलामीवीर केएल राहुल
सध्याची भारतीय गोलंदाजी लाईनअप जागतिक स्तरावरील कोणत्याही मैदानावर 20 बळी घेण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे, हे सेंच्युरियनमधील लढतीत देखील दिसून आले. दणकेबाज विजयाबद्दल भारतीय संघाचे खास अभिनंदन.
-माजी कर्णधार सचिन तेंडुलकर