वार्ताहर/ माशेल
ओपा पाणी प्रकल्पातून पणजी शहराला पाणी पुरवठा करणारी 900 एम एम क्षमतेची जलवाहिनी फुटल्याने राजधानी पणजीसह बांबोळी येथील गोमेकॉ, ताळगाव तसेच सांताक्रूझ व सांतआंद्रे भागाचा पाणी पुरवठा तुटला आहे. मुस्लीमवाडा-भोम येथे वीज खात्याचे काम सुरु असताना मोठे ड्रिल लागून ही जलवाहिनी फुटली.
मंगळवारी दुपारी भोम येथे वीज खांब टाकण्याचे काम सुरु होते. यावेळी ड्रिल मशिन लागून जलवाहिनीला क्षीद्र पडले. पाणी विभागाच्या कामगारांनी तातडीने दुरुस्तीकाम हाती घेऊन जलवाहिनीची दुरुस्त करुन पाणी पुरवठा सुरु केला होता. बुधवारी पहाटे पाण्याच्या दाबामुळे पुन्हा ही जलवाहिनी फुटली. बुधवारी दिवसभर युद्ध पातळीवर काम हाती घेऊन सायंकाळपर्यंत जलवाहिनीची जोडणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर काँक्रिट घालण्याचे काम सुरु होते.
गुरुवारी सकाळी मिळणार पाणी
काँक्रिट सुकल्यानंतर गुरुवारी सकाळी धिम्या गतीने पाणी सोडले जाईल अशी माहिती अभियंत्यांनी दिली. ही जलवाहिनी फुटल्याने पणजी शहरासह गोमेकॉ, ताळगाव तसेच सांताक्रूज व सांतआंद्रेतील काही भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी विभागाचे कार्यकारी अभियंते निवृत्ती पार्सेकर व साहाय्यक अभियंते यशवंत मापारी हे दिवसभर घटनास्थळी कामावर लक्ष ठेवून होते.