प्रतिनिधी/ म्हापसा
कोलवाळ येथे हमरस्त्यावर विराज नर्सरीच्या बाजूला असलेली जुनी मुख्य जलवाहिनी बुधवारी फुटल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याची धावपळ उडाली. पाण्याचे जोरदार फवारे उडू लागले तसेच रस्त्यावर तळीचे स्वरूप प्राप्त झाले. ही जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी आणखी एक दिवस आवश्यक असल्याने बार्देश तालुक्याला आज गुरुवारीही मर्यादित पाणी पुरवठा होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी दिली आहे.
काल बुधवारी सकाळी मुख्य जलवाहिनी नव्याने घालण्याचे काम सुरू होते. जेसीबीच्या सहाय्याने येथे खोदकाम करीत असतानाच जुन्या जलवाहिनीला जेसीबी लागून ती फुटल्याने पाण्याचे फवारे उडू लागले. पाण्याच्या प्रवाहाने जोर धरल्याने जलवाहिनीतील पाणी सुमारे एक माड उंच एवढे उडू लागले होते. उपस्थित कंत्राटदाराने पाण्याचा फवारा कमी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश येऊ शकले नाही. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने फुटलेल्या जलवाहिनीवर माती घालून पाणी तात्पुरते बंद करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीकाम सुरू होते.
घटनेचा माहिती मिळाल्यावर अभियंता व कामगारवर्गाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. दुरुस्तीकाम हाती घेतले. बुधवारी रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.
महिन्यापूर्वीच करासवाडा येथे मुख्य जलवाहिनी फुटून अशाचप्रकारे हजारो लीटर पाणी वाया गेले होते. त्यामुळे बार्देश तालुक्याला दोन दिवस पाण्याविना रहावे लागले.