प्रतिनिधी /बेळगाव
चोवीस तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विविध ठिकाणी जलकुंभ असल्याने त्याठिकाणी जलवाहिन्या घालण्यात येत आहेत. हिंदवाडी येथील घुमटमाळ परिसरात असलेल्या जलकुंभ परिसरात जलवाहिन्या घालण्यात येत असल्याने येथील रस्त्याची खोदाई करण्यात आली आहे. परिणामी हा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद आहे.
महापालिका व्याप्तीमधील 48 वॉर्डांमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शहरातील विविध भागात जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. एल ऍण्ड टी कंपनीने हे काम युद्धपातळीवर सुरू केले असून जलकुंभ असलेल्या ठिकाणी जलवाहिन्या घालण्याचे काम करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. घुमटमाळ येथील जलकुंभाद्वारे अनगोळ, टिळकवाडी, वडगाव, जुने बेळगाव अशा विविध भागात पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या घुमटमाळ परिसरात जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याकरिता हिंदवाडी परिसरातील रस्ता खोदण्यात आला आहे. हिंदवाडीतून गोमटेशशेजारी असलेल्या रस्त्यावर खोदाई करण्यात आल्याने हा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे.
येळ्ळूर, वडगाव तसेच जुने बेळगावला जाण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. पण सध्या जलवाहिन्या घालण्यासाठी रस्ता खोदण्यात आल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हा रस्ता बंद असून वाहनधारकांची गैरसोय होत आहे. येथील जलवाहिन्या घालण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच हा रस्ता वाहतुकीस खुला होणार आहे.